मालेगाव – शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या ५०० कोटी खर्चाच्या भुयारी गटार योजनेमुळे शहरातील रोगराईची समस्या कायमची संपुष्टात येईल तसेच शहर स्वच्छ होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे. येथील सोयगाव शीव रस्ता भागातील श्री छत्रपती कॉलनी नामफलकाचे अनावरण भुसे यांचे हस्ते पार पडले. याप्रसंगी भुसे यांनी शहरात सुरु असलेल्या आणि भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा उहापोह केला.

हेही वाचा >>> “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा…”, संजय राऊतांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “आम्ही सगळं भोगूनही…”

अमृत योजनेंतर्गत शहरात भुयारी गटार योजना व्हावी म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याच अनुषंगाने मध्यंतरी मालेगाव दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालण्यात आले होते. त्यानुसार पाचशे कोटी खर्चाच्या भुयारी गटार योजनेस केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. लवकरच हे काम सुरू होणार असून हे काम पूर्णत्वास आल्यावर दुर्गंधीला आळा बसणार आहे. तसेच मच्छरांच्या त्रासातून शहरवासियांची मुक्तता होईल,असे भुसे म्हणाले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे योजनेची जलवाहिनी चार दशकापेक्षा अधिक जुनी आहे. त्यामुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत असल्याने पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत असतो.

हेही वाचा >>> नाशिक: महापालिका प्रशासनाधिकारी सुनिता धनगर लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही समस्या सोडविण्यासाठी शंभर कोटी खर्चाची तळवाडे ते मालेगाव नवीन जल वाहिनीचे कामदेखील मंजूर झाले आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील सर्व भागात मुबलक पाणीपुरवठा होईल, असा दावाही भुसे यांनी केला. नव्याने विकसित झालेल्या श्री छत्रपती कॉलनी परिसरात रस्ते,गटार,स्वच्छता,पाणी,पथदीप यासारख्या मूलभूत सुविधांची वानवा आहे, याकडे स्थानिकांनी भुसे यांचे यावेळी लक्ष वेधले. त्याची दखल घेत लवकरच हे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील,असे आश्वासन भुसे यांनी दिले. कार्यक्रमास रमेश शेवाळे, साहेबराव मोरे, प्रवीण पाटील, सुनील भडांगे, गोरक्षनाथ कदम, संतोष निकम, दीपक बच्छाव, प्रा.महेंद्र पाटील, पांडुरंग शिरसाठ, संतोष निकम, वसंत पवार, रामदास ढोणे, प्रशांत अहिरे, संदीप नेमणार आदी उपस्थित होते.