नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षक पुरस्कार सोहळ्यात दादा भुसे यांची अपेक्षा

शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे शिक्षकांचा सन्मान होत असून त्यांच्या उत्तम कामाचे अनुकरण इतर शाळांमध्ये केले जावे. यामुळे शिक्षण विकासासाठी मदत होईल, असा आशावाद ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या वतीने गुणवंत शिक्षकांना रविवारी भुसे यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी भुसे यांनी काळानुरूप मुलांना इंग्रजी शाळांमध्ये पाठविण्याचे प्रमाण वाढत असल्याने तुलनेत जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत मांडले. बऱ्याच ठिकाणी शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता शाळांसाठी विविध कामे ग्रामस्थांच्या मदतीने केली जात आहेत.

डिजिटल स्कूल, ई-लर्निगचे उपक्रम पूर्ण केले आहेत. गावातील गरिबांनी मजुरी करून शाळेच्या विकासासाठी निधी दिल्याची प्रेरणादायी उदाहरणे आहेत. आदिवासी क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा अनुशेष आंतरजिल्हा बदलीमधून भरण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

या वेळी आ. जयंत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, मुख्य कार्यकारी अधिकारी आदींनीही विचार मांडले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश वडजे, शिक्षण सभापती किरण थोरेही उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते हाताणे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका वैशाली भामरे यांनी बालविश्व नावाने तयार केलेल्या ब्लॉगचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांमध्ये दीपक खैरनार (बागलाण), चंद्रभान पवार (चांदवड), अनंत देवरे (देवळा), रमेश मोरे (दिंडोरी), अविनाश घोलप (इगतपुरी), जिभाऊ निकम (कळवण), राजेंद्र दिघे (मालेगाव), भाऊसाहेब निकम (नांदगाव), चंद्रकांत लहांगे (नाशिक), नवनाथ सुडके (निफाड), संजय बागूल (पेठ), संजय आव्हाड (सिन्नर), राजाराम राऊत (सुरगाणा), रवींद्र देवरे (त्र्यंबकेश्वर), राजेंद्र कुशारे (येवला) यांचा समावेश आहे