नाशिक : गोकुळाष्टमीचे वातावरण शहरासह जिल्ह्यात तयार झाले आहे. शहर परिसरात काही संस्था, राजकीय पक्षाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनामुळे शाळास्तरावर काहींनी शनिवारी तर काहींनी पुढील आठवड्यात दहीहंडीचे नियोजन केले आहे. दुसरीकडे, पालकांकडून गोकुळाष्टमीसाठी खास करून कृष्णाच्या पोशाखाची मागणी वाढत आहे. या पोशाखांवर मालिकांची छाप आहे.

बालगोपालांसह सगळेच गोकुळाष्टमीसाठी उत्सुक असतांना थरावर थर चढत जातांना टोकावर लावलेली दहीहंडी कोण फोडणार, याची उत्सुकता आणि त्या उत्सुकतेपोटी पैज लावली जाते. त्यानंतर दिला जाणारा दहीकाल्याचा प्रसाद हा तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. यंदाही गोकुळाष्टमीसाठी उत्साहाला उधाण आले आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यदिन आणि शनिवारी गोकुळाष्टमी असल्याने शाळा पातळीवर उत्सवासाठी होणारी धावपळ पाहता पुढील आठवड्यात दहीहंडी ठेवली आहे.

पूर्व प्राथमिक गटात बालगोपालांला दहीहंडी उत्सव रंगला. पालकांकडून राधा-कृष्णाच्या पोशाखासाठी मागणी वाढली आहे. वेगवेगळ्या वाहिन्यांवर सुरू असलेल्या श्रीकृष्ण मालिकांमधील श्रीकृष्णाच्या पोशाखानुसार पोशाख हवा, अशी मागणी होत आहे. याविषयी विविध पोषाख भाड्याने देणाऱ्या वृषाली माहेगांवकर यांनी माहिती दिली. वेगवेगळ्या वाहिन्यांवर सध्या श्रीकृष्णाची मालिका सुरू आहे. त्यानुसार वेल्वेटचे पोशाख, श्रीकृष्णाच्या पारंपरिक मुकूटाऐवजी मलमली कपड्याची पगडी, फुलांची पगडी, पालकांना हवी आहे.

मुलगी असली तरी पुढील नवरात्र पाहता पालकांना आपल्या मुलींना कृष्ण करायचे आहे. पोशाखासाठी साधारणत: २०० ते ५०० रुपये भाडे आकारण्यात येत असल्याचे माहेगांवकर यांनी नमूद केले. कृष्ण करण्यासाठी पालक उत्सुक असतांना गोकुळातील देवकी, यशोदा, नंद, पेंद्या आणि अन्य गोपाल होण्यास फारसे कोणी तयार नाहीत. यामुळे अन्य पोशाखांवरील धुळही अद्याप झटकली गेलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे गोकुळाष्टमीसाठी बालकृष्ण, कृष्णाच्या विविध रुपातील धातु, मातीसह अन्य प्रकारातील आकर्षक मूर्ती, बासरी, कृष्णाचे दागिने, बाळकृष्णाचे मलमली वस्त्र यासह गळ्यातील माळा, पाळणा, अशा साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. ग्राहकांकडून सामान खरेदी करण्यासाठी गर्दी होत असतांना गोपालाला नैवेद्य दाखवण्यासाठी खास ५६ भोगसह अन्य मिठाईलाही ग्राहकांकडून मागणी आहे. शहरासह जिल्ह्यातील कृष्ण मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात येत आहे. यानिमित्ताने राजकीय पक्ष, काही संस्थांच्या वतीने गोकुळाष्टमीसाठी दहीहंडी घेण्यात येणार आहे. यासाठी खास नामवंत कलाकारांना बोलावण्यात येत आहे.