जळगाव : जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांच्या राजीनाम्याच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी बुधवारी संचालक मंडळाची बैठक होणार आहे. बैठकीत राजीनामे मंजूर झाल्यानंतर नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडले जातील.

जिल्हा बँकेत महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट हे सत्तेत आहेत. सध्या जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे १०, ठाकरे गटाचे दोन, काँग्रेसचे तीन, शिंदे गटाचे पाच, भाजपचा एक, असे पक्षीय बलाबल आहे. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बँकेची निवडणूक लढविण्यात आली होती. गतवर्षी शिवसेनेत फूट पडली. बँकेचे उपाध्यक्षपद ठाकरे गटाकडे आहे. उपाध्यक्ष सोनवणे यांच्या राजीनाम्यानंतर या जागेवर शिंदे गटाच्या संचालकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ठाकरे गट की शिंदे गट कोणाला संधी द्यावी, अशी द्विधा स्थिती राष्ट्रवादीसमोर आहे. त्यासंदर्भात बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवकर यांनी बँकेच्या कार्यकारी संचालकांकडे दिलेला पदाचा राजीनामा सहकार विभागातर्फे मंजूर करण्यात आला होता. संचालक मंडळाच्या बैठकीत देवकर यांचा राजीनामापत्र देण्याची सूचना सहकार विभागाकडून करण्यात आली होती. त्याअनुषंगाने बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांचे राजीनामे मंजूर केले जातील. उपाध्यक्षांचे नाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाबाबत राष्ट्रवादीकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले.