जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मेहुणबारे येथे शालेय शुल्का व्यतिरिक्त अकरावी प्रवेशासाठी १० हजार रुपये लाच स्वीकारताना शिक्षक आणि लिपिकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोघांविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षक गुलाब साळुंखे (४५, रा. मेहुणबारे) आणि लिपीक उल्हास बागूल (४२, रा. चाळीसगाव) अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदाराचा मुलगा शाळेतून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच संस्थेच्या उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी अर्ज करत होता. यावेळी शिक्षक आणि लिपिकाने प्रवेशासाठी एकूण २० हजार रुपयांची मागणी केली. पैकी १० हजार रुपये ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर उर्वरित १० हजार रुपये प्रवेशाच्या वेळी द्यावे लागतील, अशी अट त्यांनी घातली होती. तक्रारदाराने त्याबद्द्ल धुळे येथील लाचलुचचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदाराकडून १० हजारांची लाच स्वीकारताना शिक्षक गुलाब साळुंखे यांना रंगेहाथ अटक केली. पुढील तपासात लिपीक उल्हास बागुल यालाही अटक करण्यात आली. या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी केले. त्यांच्यासोबत हवालदार राजन कदम व हवालदार संतोष पावरा यांच्या पथकाने सदरची कारवाई यशस्वी केली.