नाशिक – लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाशिकमधून करण गायकर आणि दिंडोरीतून मालती थवील यांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याआधी उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बी. डी. भालेकर मैदानापासून फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग घेतला. जोरदार घोषणाबाजी करत ही फेरी भालेकर मैदानातून शालिमार येथे आली. शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन फेरी पुन्हा शालिमार येथे आली. सार्वजनिक वाचनालय, महात्मा गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचली. यावेळी अर्ज भरण्यासाठी उमेदवार गायकर हे जात असताना प्रवेशद्वारावर उपस्थित कर्मचाऱ्यांशी त्यांचे वाद झाले.

हेही वाचा – नाशिकमध्ये पाच गावठी बंदुकांसह १८ कोयते, तलवारी जप्त

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहराध्यक्ष अविनाश शिंदे, पवन पवार, बजरंग शिंदे, कविता गायकर आदी उपस्थित होते. यावेळी गायकर यांनी, आम्हाला टीका, टिप्पणीपेक्षा विकासाचे राजकारण करायचे असल्याचे सांगितले. विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविणार असून शेती, कामगार, विकास, सहकार, पर्यावरण अशा विविध मुद्यांवर काम करणार असल्याचे नमूद केले.

हेही वाचा – हेमंत गोडसे यांच्यावर साडेसहा कोटींचे कर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेरीत मनोज जरांगे यांचीही प्रतिमा

वंचित बहुजन आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या फेरीत उपस्थितांच्या हातात शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहु महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह मनोज जरांगे यांचीही प्रतिमा होती. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत आपला कोणत्याच पक्षाला पाठिंबा नसल्याचे याआधीच जाहीर केले असतानाही फेरीत जरांगे यांची प्रतिमा दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.