धुळे : नागपूर-सुरत महामार्गावर साक्री शिवारात झालेल्या भीषण अपघातात नवरदेवासह त्याची आई आणि आणखी एक व्यक्ती अशा तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी साक्री पोलिसांनी कार चालक नरेश कांतीलाल वाघ (रा. सोनज-टाकळी, ता. मालेगाव) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून प्राणांतिक अपघात घडविल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

मृतांमध्ये प्रमिला रघुनाथ जाधव (वय ६२, रा. कासारे, ता. साक्री), विजय रघुनाथ जाधव (वय २९, रा. कासारे, ता. साक्री) आणि प्रतिभा धनंजय पगारे (वय २६, रा. उमराणे, ता. देवळा, जि. नाशिक) या तिघांचा समावेश आहे. अपघातात कार्तिकी धनंजय पगारे (वय ६, रा. उमराणे), महेंद्र बळवंत जाधव (वय ३६, रा. कासारे) आणि संकेत कैलास जाधव (वय २३, रा. यजगाव, ता. मालेगाव) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री सुरपान (ता. साक्री) शिवारात घडला. एमएच ०१ बीएफ ८८१४ क्रमांकाची भरधाव कार नागपूर-सुरत महामार्गावरील दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला.

कार चालकाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजी आणि बेजबाबदार पद्धतीने वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादी लोकेश विलास वेळीस (रा. कासारे, ता. साक्री) यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

राज्यातील नागपूर-सुरत महामार्गावर वारंवार अपघातांच्या घटना घडत आहेत. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक व प्रवासी वाहतूक सुरू असल्याने वाहने अतिवेगाने धावत असतात. अंधाऱ्या भागात रस्ता अरुंद, तसेच योग्य सिग्नल आणि चेतावणी फलकांचा अभाव यामुळे वाहनचालकांना रस्ता नीट दिसत नाही, परिणामी अशा दुर्घटना घडतात. संबंधित विभागांनी अशा अपघातप्रवण ठिकाणांची तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

वाहतूक तज्ज्ञांच्या मते, महामार्गांवर सुरक्षित वाहनचालना सुनिश्चित करण्यासाठी वाहनचालकांनी थकलेल्या अवस्थेत ड्रायव्हिंग टाळावे, सीटबेल्ट आणि वेगमर्यादा काटेकोरपणे पाळावी, तसेच रस्त्यावर असलेले चेतावणी फलक व सिग्नल याकडे दुर्लक्ष करू नये. शासन व प्रशासनाकडूनही चालकांना जागरूक करण्यासाठी रस्ते सुरक्षा मोहिमा राबविल्या जाण्याची गरज आहे, जेणेकरून जीवघेणे अपघात टाळता येतील आणि रस्त्यांवरील प्रवास अधिक सुरक्षित बनेल.

या अपघातातील चालक नरेश वाघ हा जखमी झाला असून त्याच्यावर धुळे येथे जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. अपघातातील अन्य जखमींचीही प्रकृती धोक्या बाहेर आहे. – अनिल बागुल, सहाय्यक पोलिस निरीक्षक (साक्री पोलीस ठाणे)