धुळे : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन अभिनित ‘पुष्पा ‘ चित्रपटातील पध्दतीनुसार खाद्यतेलाच्या टँकरमधून गुजरातला पाठविण्यात येणारी विदेशी दारु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणली आहे. या कारवाईत टँकर आणि दारूसह पोलिसांनी तब्बल एक कोटी ९६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चालकाविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहनलाल जाट (२५, रा. बरेवातला, ता. बाडमेर, राजस्थान) असे संशयित चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना हरियाणाहून खाद्यतेलाच्या टँकरमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारुची तस्करी गुजरातकडे होणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि नरडाणा पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक तयार करून मुंबई-आग्रा महामार्गावर आकांक्षा हॉटेलजवळ नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान २२ चाकी टँकर आला असता चालकाने टँकरमध्ये खाद्यतेल असल्याचे सांगितले. संशय आल्याने पंचासमक्ष पोलिसांनी तपासणी केली असता, टँकरच्या आत लोखंडी पत्र्याने सहा कप्पे तयार करून त्यांचे झाकण नट-बोल्ट आणि वेल्डिगने घट्ट केलेले आढळले.
गॅस कटरने त्यांचे झाकण उघडल्यावर त्यातील चार कप्प्यांमध्ये विदेशी दारु लपविल्याचे आढळले.१३ ऑगष्ट रोजी रात्री अडीच वाजता ही कारवाई करण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे मयूर पाटील यांनी म्हटले आहे.
टँकरमधील दारूचे खोके काढण्यात आले असता त्यातील बाटल्या आणि कंसात किंमत अशी -३,५४० बाटल्या (रुपये ४२ लाख ४८ हजार), ८४० बाटल्या (आठ लाख ९८ हजार ८०० रुपये), ४२० बाटल्या (चार लाख ४९ हजार ४०० रुपये) आणि टँकरची किंमत ४५ लाख रुपये अशी एकूण ५५ लाख ९६ हजार २०० रुपये किंमतीची ४०० खोक्यातील विदेशी दारु आणि ४५ लाख रुपये किंमतीचा टँकर असा एक कोटी ९६ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चालकाविरुध्द नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या दारुचा मूळ स्त्रोत आणि विक्रीचे ठिकाण याबाबत तपास सुरू असून, ही कारवाई श्रीराम पवार, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, अंमलदार पवन गवळी, आरीफ पठाण, देवेंद्र ठाकुर, राहुल सानप, मयुर पाटील, नरडाणा पोलीस ठाण्याचे अंमलदार रवींद्र मोराणीस, ललित पाटील, राकेश शिरसाट, योगेश गिते व मोरे यांच्या पथकाने केली.