धुळे : शिरपूर तालुक्यातील विखरण येथील कुरेशी जिनिंग अँड प्रेसिंग सेंटरमध्ये भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) द्वारे सुरू असलेल्या कापूस खरेदी प्रक्रियेची जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपूते यांनी सोमवार (दि.१७) रोजी अचानक पाहणी केली.
कापूस खरेदी हंगाम वेग पकडत असताना प्रतवारीतील तक्रारी, वाढती आर्द्रता आणि ऑनलाईन नोंदणीतील अडचणी याच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा तपासणी दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे खरेदी केंद्रावर तत्परता, पारदर्शकता आणि शिस्तबद्धता वाढल्याचे म्हटलेजाते आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रावर पोहोचताच प्रतवारी, मोजणी प्रक्रिया, वजनातील पारदर्शकता, आर्द्रता चाचणी आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा यांची सविस्तर तपासणी केली. दाखल कापसाची प्रतवारी त्यांनी स्वतः करून पाहिली आणि प्रतवारीकार अजय कुमार यांच्यासोबत चर्चा करत प्रतवारी अचूक, वैज्ञानिक आणि शेतकरीहितांची असावी, असे स्पष्ट निर्देश दिले.
या वेळी जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर, केंद्र संचालक शरीफ कुरेशी, बाजार समिती अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शिरपूर, साक्री आणि धुळे तालुक्यातील केंद्रांवर या वर्षी कापसाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. काही ठिकाणी आर्द्रता वाढ, प्रतवारीतील तक्रारी आणि ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अडथळे येत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत होते. या तक्रारींची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याचा सातबारा मागवून ‘कपास किसान’ अॅपवर प्रत्यक्ष नोंदणी करून पाहिली.
नोंदणी प्रक्रिया सोपी आणि जलद असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना घरबसल्या अॅपद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे केंद्रावरील गर्दीही कमी होईल. खरेदी केंद्रातील पिण्याचे पाणी, सावली, बसण्याची व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा आणि वजन प्रक्रियेतील पारदर्शकता यांचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले.
शेतकऱ्यांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन खरेदी व मोजणीतील अत्यंत पारदर्शकता राखावी आणि देयक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी बाजार समितीला दिले. जिल्ह्यात कापूस हंगाम वेगाने सुरू असून पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा पाहण्या नियमित घेतल्या जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अचानक झालेल्या या भेटीनंतर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व वेगवान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
