धुळे – आपण भाजप किंवा राष्ट्रवादीत गेलो, तरी तोच कार्यकर्त्यांचा सन्मान असेल. यासंदर्भात आपण रविवारी सकाळी निर्णय जाहीर करणार, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी आमदार कुणाल पाटील यांनी घेतली आहे.
पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी कार्यकर्त्यांची भावना जाणून घेण्यासाठी शनिवारी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी ‘तुम्ही सांगाल ते धोरण, तुम्ही सांगाल तेच तोरण’ अशी भावना व्यक्त करुन पाटील यांना पाठिंबा दिला. यावेळी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी या तालुक्यातील किमान एक लाख लोकांनी मला मते दिली आहेत.
ज्यांनी यापूर्वी केले नव्हते, त्यांनीही दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये आपणास मतदान केले. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकीत किमान दोन लाख मतांनी कुणाल. पाटील यांना लोक निवडून देतील. मी जेव्हा कामानिमित्त रवींद्र चव्हाण यांना भेटलो असता, त्यांनी आपले म्हणणे जाणून घेतले. तीन पिढ्यांचा आमचा काँग्रेसशी सबंध असल्याचे आपण त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी तू स्वतः साठी नाही तर आपल्या कार्यकर्त्यांचा विचार कर, असा सल्ला दिला.
त्यामुळे आपण केवळ स्वतःची प्रतिमा जपणार नाही. कार्यकर्त्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल. आपण दहा वर्षांपासून आमदार म्हणून काम करत असतानाच भाजपमध्ये येण्याचा आपणास आग्रह होता. जो काही निर्णय घेणार, कार्यकर्त्यांच्या होकारानेच होईल, असे पाटील यांनी सांगताच उपस्थितांनी निर्णय घेतल्याचे जाहीर करा, अशी घोषणाबाजी केली. त्यावर पाटील यांनी, थोडा वेळ द्या, उद्या सकाळी तुम्हाला माझा निर्णय कळवतो, असे सांगितले.
कुणाल पाटील यांनी नुकतीच भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली होती. त्यामुळे पाटील हे भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली.