धुळे- आवाजाची भिंत (डीजे) आणि लेझर प्रकाश यांचा अजिबात वापर न करता पार पडलेली धुळ्यातील गणेश विसर्जन मिरवणूक संपूर्ण राज्यात आदर्श ठरली आहे. परंतु, विसर्जन मिरवणुकीनंतर आता ‘ धिवरे पॅटर्न ‘ मुळे धुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
धुळे शहरातील बहुतेक भाग संवेदनशील आणि काही भाग अतीसंवेदनशील आहे. यामुळे प्रामुख्याने दोन्ही समाजांवर आणि काही कार्यक्रमांवर पोलिसांना विशेष लक्ष केंद्रित करावे लागते. गणपती उत्सवाकडेही याच पार्श्वभूमीतून पाहिले जात असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रथम न्यायालयाचा दाखला देत आवाजाच्या भिंती आणि लेझर प्रकाश गणेशोत्सवात वापरण्यास प्रतिबंध घालण्यासाठी जनजागृतीवर भर दिला. यासाठी संबंधित व्यावसायिकांच्या बैठका घेवून त्यांना या वाद्य किंवा प्रखर-तीव्र प्रकाशामुळे संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली. धिवरे यांचे म्हणणे अनेकांना पटले. बहुतेकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यामुळे धुळ्याच्या विसर्जन मिरवणूका रात्री उशिरापर्यंत चालल्या तरी कोणत्याही मंडळांनी पारंपरिक वाद्य, भजन, धार्मिक गाणी आणि सजीव देखाव्यात समाजपयोगी जनजागृतीवर भर दिला. कुठल्याही अप्रिय गोष्टींना थारा दिला नाही. यामुळे संपूर्ण विसर्जन उत्साहात आणि शांततेत झाले. दुसऱ्या दिवशी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः महापालिकेच्या विसर्जन स्थळाना भेटी देण्याचे ठरविले. पांझरा नदीच्या काठावरून जाताना अनेक मूर्ती जागोजागी उघड्यावर पडल्या असल्याचे त्यांना दिसले.
शहरातील विविध भागातून निघालेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर बहुतेकांनी मूर्ती विसर्जन केले खरे, पण रात्रीतून पांझरा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने बहुतेक मूर्ती पाण्याबाहेर उघड्यावर आल्या असल्याचा अंदाज धिवरे यांना आला. यामुळे त्यांनी आपले वाहन थांबवून खात्री केली. आणि उघड्यावर आलेल्या सर्व मूर्ती उचलून त्यांचे हत्ती डोहात विसर्जित करण्याची कल्पना त्यांना सूचली. यासंदर्भात धिवरे यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना सूचित केल्यावर त्यांच्या अधीपत्याखालील कर्मचाऱ्यांनी अधीक्षक धिवरे यांच्या संकल्पनेला प्रतिसाद दिला. धिवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी मूर्ती जमा करण्याच्या कामाला लागले. शेकडो मूर्ती जमा होऊन त्या एका खासगी वाहनात ठेवण्यात आल्या. या सर्व मूर्तींचा प्रवास पांझरा नदीतल्याच खोल हत्ती डोहाकडे सुरु झाला. हत्ती डोहाजवळ पोहोचल्यावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भक्तीभावाने सर्व मूर्तीचे सुरक्षित विसर्जन करण्यात आले.
गणेश उत्सवानंतर विसर्जनाच्या दिवशी भाविकांनी पांझरा नदीच्या किनारी गणपती मूर्तींचे विसर्जन केले खरे, पण दुसऱ्या दिवशी अनेक मूर्ती नदीकाठी आणि अंजनशा बाबा दर्गासमोर उघड्यावर असल्याचे दिसले. अशा उघड्यावरील मूर्तीची संभाव्य विटंबना टाळण्यासाठी त्या जमा करण्यात आल्या. यानंतर खासगी वाहनाने हत्ती डोह या ठिकाणी नेऊन विसर्जन करण्यात आले. – श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक,धुळे)