धुळे : शिरपूर-वरवाडे नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने आज भव्य शक्तिप्रदर्शन करत नगराध्यक्षपदासाठी अमरिशभाई पटेल यांच्या कुटुंबातील दोन उमेदवारांचे अर्ज दाखल केले. मंत्री पटेल यांचे बंधू माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल आणि पुत्र चिंतनभाई पटेल यांनी हे उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्षपदासह सर्व ३२ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शविल्याने शिरपूरमधील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

नामांकनाचा शेवटचा दिवस असूनही भाजप आणि मित्रपक्षांमध्ये स्थानिक स्तरावर अधिकृत युती झालेली नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वांनी स्वतंत्र ताकदीने निवडणुकीत उतरण्याची रणनीती आखली आहे. शिरपूर शहरात राष्ट्रवादीची ताकद मर्यादित असली तरी अलीकडील प्रवेश आणि गटबांधणीमुळे शिवसेना शिंदे गट पूर्वीपेक्षा अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट होते. यामुळे भाजप म्हणजेच अमरिशभाई पटेल यांच्या प्रभावाला पहिल्यांदाच तुलनेने कणखर आव्हान उभे करण्यासाठी शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही पक्षांनी गुप्त चर्चांना वेग दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, शिरपूर येथे झालेल्या विजयी संकल्प मेळाव्यात पालक मंत्री जयकुमार रावल आणि माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या उपस्थितीत दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल झाले.

शिरपूर विधानसभा क्षेत्रात गेली चार दशके अमरिशभाई पटेल यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसमधून भाजपात आल्यावरही त्यांचा प्रभाव शहरापासून तालुक्यापर्यंत आणि संपूर्ण मतदारसंघात अखंड टिकून राहिला. तथापि, या निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांनी भाजप सोडल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी अलीकडेच पटेल गटातील काही समर्थकांना आपल्याकडे ओढत गटबांधणी मजबूत केली. महाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भाजपशी युती न करता शक्य असल्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युतीचा पर्याय विचारात आहे; मात्र शिरपूर नगराध्यक्षपदासह सर्व ३२ जागांवर उमेदवार देऊन निवडणूक ताकदीनिशी लढवली जाईल.

माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी शहरातील सर्वांगीण विकासाच्या आधारे शिरपूरकर पुन्हा भाजपालाच भरघोस विजय देतील, असा विश्वास व्यक्त केला. तर पालक मंत्री रावल यांनी शिरपूर, धुळे, शिंदखेडा आणि नवापूर या चारही नगरपरिषदांवर भाजप-महायुती विजय मिळवेल असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला. यामुळे शिरपूरमधील वाढत्या राजकीय हालचाली, गटबांधणी आणि संभाव्य युतीमुळे ही निवडणूक यंदा अधिक चुरशीची ठरणार आहे असे अधोरेखित झाले आहे.