आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने चार सदस्यीय प्रभाग रचनेचा घेतलेला निर्णय गोंधळ वाढविणारा आहे. सध्याच्या दोन सदस्यीय प्रभागातच सदस्यांमध्ये मतभिन्नता असते. या स्थितीत चार सदस्य एकत्रितपणे कसे काम करणार, असा प्रश्न मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला. मनसेतून बाहेर पडणाऱ्या नगरसेवकांची संख्या वाढत असल्याच्या मुद्दय़ावर त्यांनी एकदा कोणाची पक्षातून बाहेर पडायची मानसिकता झाली तर त्यात बदल करणे अवघड असल्याचे मान्य केले. आगामी काळात मनसेतून बाहेर पडणाऱ्या नगरसेवकांना रोखण्याचे प्रयत्न होणार नसल्याचे हे संकेत मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, मनसेने नांदगावकर यांच्याकडे नाशिकची धुरा सोपविल्याचे दिसत आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या नांदगावकर यांनी मनसेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत तयारीला सुरुवात केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मतप्रदर्शन केले. सध्या राज्यात निघणाऱ्या मराठा मोर्चाचे भाकीत दोन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी केले होते. ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याचा दुरुपयोग होईल हे सांगणारे राज ठाकरे हे एकमेव नेते होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील कधी त्याबद्दल मत प्रदर्शित केले नव्हते. कोपर्डी येथे पीडितांची भेट घेतल्यानंतर राज यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केली होती, असा दाखला नांदगावकर यांनी दिला.

नाशिक शहरात विकासकामांसाठी कारखान्यांच्या ‘सीएसआर’ निधीतून सर्वाधिक निधी मिळविण्यात आला. त्याद्वारे गोदा उद्यानासह अनेक कामे प्रगतिपथावर आहेत.

नगरसेवकांनी प्रभागात अनेक विकासकामे केली आहेत. नाशिकमध्ये कामे मोठय़ा प्रमाणात झाली असली तरी जनतेपर्यंत ती पोहोचविण्यात मनसे कमी पडली, याकडे नांदगावकर यांनी लक्ष वेधले.

काही कामे आजही रखडली असून त्याचे खापर त्यांनी राज्य शासनावर फोडले. जकात, नंतर स्थानिक संस्था कर बंद झाल्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. सिंहस्थासाठी खर्च झालेला निधी शासनाने दिला नाही. जो निधी आधी दिला, त्याचे व्याज पालिकेकडून घेतले गेले. सध्या मुख्यमंत्री ‘स्मार्ट सिटी’ वा तत्सम शहरांमध्ये ज्या काही वेगळ्या योजना मांडत आहेत, त्या बहुतांश राज यांच्या ‘ब्लू प्रिंट’मधील असल्याचा टोलाही नांदगावकर यांनी लगावला.

माजी आयुक्तांबाबत मनसेत मतभिन्नता

पालिकेचे माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कामकाजावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे खूश असले तरी याच पक्षाचे माजी आमदार बाळा नांदगावकर मात्र नाखूश आहेत. गेडाम यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र राबविले. त्यामुळे विकासकामांना खीळ बसल्याची तक्रार नांदगावकर यांनी केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difficult to change the mentality of the party leaving member says bala nandgaonkar
First published on: 28-09-2016 at 05:20 IST