बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचा आणखी एक प्रयत्न

शहरातील बेशिस्त रिक्षा वाहतुकीतून प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी जिवघेणी परीक्षाच असते.

रस्त्यावर प्रवासी मिळविण्यासाठी मोठय़ाने ओरडणे, रिक्षा चालविताना भ्रमणध्वनीवर बोलणे, उध्दट वर्तन करणे अशा विविध २८ गुन्ह्यांखाली दंडात्मक कारवाई होऊ शकते, याची जाणीव संबंधितांना करून देण्यात आली आहे.

कुंभमेळ्यातही गाजलेल्या शहरातील बेशिस्त रिक्षा वाहतुकीतून प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी जिवघेणी परीक्षाच असते. कुठे क्षमतेहून अधिक प्रवासी कोंब तर कुठे मीटर न टाकता मनमानीपणे पैसे उकळ. बस थांब्यांवर अतिक्रमण करून प्रवासी पळव तर कुठे नियमांवर बोट ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसालाच मारहाण कर.. चालकांच्या अशा विचित्र कार्यशैलीमुळे नाशिकमधील रिक्षा व्यवसाय बदनाम झाला आहे. रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी नव्याने पुढाकार घेतला आहे. रस्त्यावर प्रवासी मिळविण्यासाठी मोठय़ाने ओरडणे, रिक्षा चालविताना भ्रमणध्वनीवर बोलणे, उध्दट वर्तन करणे अशा विविध २८ गुन्ह्यांखाली दंडात्मक कारवाई होऊ शकते, याची जाणीव संबंधितांना करून देण्यात आली आहे.
राजकीय पक्ष आणि नेत्यांशी संलग्न असणाऱ्या रिक्षा चालकांचे खासगी प्रवासी वाहतुकीवर पूर्णपणे वर्चस्व आहे. वाहतूक नियमांचे पालन हा विषय त्यांच्या गावी नसतो. बाहेर गावाहून येणाऱ्यांबरोबर स्थानिक नागरिकांना रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराचा फटका दररोज सहन करावा लागतो. एरवी, लहानसहान कारणांवरून रस्त्यावर उतरणाऱ्या रिक्षा चालक-मालक संघटनेकडून बेशिस्त रिक्षाचालकांना धडा शिकविण्यासंदर्भात कोणतीच कार्यवाही केली जात नाही. या परिस्थितीत बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांना रिक्षा चालकांकडून धक्काबुक्की व मारहाण झाल्याची उदाहरणे आहेत. वाहतूक पोलिसांनी संबंधितांविरोधात मोहीम सुरू केली की, बंदचे अस्त्र उगारले जाते. दबाव तंत्राद्वारे रिक्षा संघटनांनी शासकीय यंत्रणांच्या मोहिमांना गुंडाळून ठेवणे भाग पाडल्याचा इतिहास आहे. या एकंदर स्थितीत रिक्षा वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नाशिकरोड येथे पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी संबंधितांच्या बैठकीचे आयोजन केले होते. नाशिकरोड पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीस विविध रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चालकांना जबाबदारी व नियमांची जाणीव जशी करून दिली गेली, तसेच त्यांच्या अडचणी समजावून घेण्यात आल्या. त्यावर काय तोडगा काढता येईल यावर विचारविनिमय झाला.
रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या २८ कलमांद्वारे संबंधितांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांवर कारवाई होऊ शकते, याचे माहितीपत्रक बैठकीत वितरित करण्यात आल्याचे धिवरे यांनी सांगितले. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई सुरू राहणार आहे. त्यात अवैध प्रवासी वाहतूक, परवान्याचे उल्लंघन, थांबा सोडून रिक्षा थांबविणे, मीटरमध्ये फेरफार, वाहन चालविताना धुम्रपान करणे, क्षमतेहून अधिक प्रवासी वाहतूक आदी मुद्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. कोणत्या गुन्ह्याखाली किती रुपये दंड भरावा लागेल याची माहिती लेखी स्वरुपात संबंधितांना देण्यात आली. मुदत संपुष्टात आलेली रिक्षा प्रवासी वाहतूक करताना अथवा रिक्षा वाहतुकीशी संबंधित अन्य काही तक्रारी असल्यास चालक पोलिसांच्या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर तक्रारी नोंदवू शकतात. थांब्यांची संख्या वाढविण्याच्या मागणीवर पालिकेशी चर्चा करून तोडगा काढला जाणार आहे.
पोलिसांनी नव्याने सुरू केलेल्या प्रयत्नांचे काय होणार, हे पुढील काळात पहावयास मिळणार आहे.
या कारणांसाठी रिक्षा चालकांना होईल दंड
ल्ल प्रवासी मिळविण्यासाठी जोरात ओरडणे ल्ल वाहन चालविताना भ्रमणध्वनीवर बोलणे ल्ल वाहन चालविताना धुम्रपान करणे ल्ल उद्धट वर्तन करणे ल्ल भाडे नाकारणे, जादा भाडे मागणे आदी २८ बाबी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Discipline workshop for rickshaw drivers

ताज्या बातम्या