scorecardresearch

Premium

नाफेडच्या खरेदीनंतरही निरुत्साह, लासलगाव बाजारात कांदा दरात अल्प घसरण

नाफेड व एनसीसीएफ यांच्यावतीने राज्यात कांदा खरेदीचा शुभारंभ झाला असला तरी पहिल्या दिवशी कांद्याच्या घाऊक बाजारात निरुत्साहाचे वातावरण ठळकपणे अधोरेखीत झाले.

onion
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम)

नाशिक : नाफेड व एनसीसीएफ यांच्यावतीने राज्यात कांदा खरेदीचा शुभारंभ झाला असला तरी पहिल्या दिवशी कांद्याच्या घाऊक बाजारात निरुत्साहाचे वातावरण ठळकपणे अधोरेखीत झाले. कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत आदल्या दिवशीच्या तुलनेत प्रति क्विंटल सरासरी दर २० रुपयांनी कमी होऊन ८३० रुपयांवर घसरले. इतर बाजार समित्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती होती. उन्हाळ कांद्याची आवक हळूहळू कमी होत आहे. चांगल्या प्रतिचा माल बाजारात येत आहे.

नाफेडने प्रत्यक्ष बाजार समितीत खरेदी केल्यास स्पर्धा होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्याचे दर तेजीत येऊ शकतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. महिनाभरापासून उन्हाळ कांद्याचे भाव ७०० ते ८०० रुपयांच्या दरम्यान गटांगळ्या खात आहेत. दरवर्षी एप्रिलपासून नाफेडची खरेदी सुरू होते. यंदा तिला दीड ते दोन महिन्यांचा विलंब झाला. या काळात मुबलक उत्पादनामुळे कांद्याची अतिशय अल्प दरात विक्री करावी लागल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. रखडलेल्या नाफेडच्या खरेदीला नाशिकसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, अहमदनगर या ठिकाणी सुरुवात झाली. जिल्ह्यात १४ फेडरेशन व नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत ही खरेदी होणार आहे.

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
What Udaynidhi Stalin Said?
उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..”

हेही वाचा >>> मनमाडकरांना १८ दिवसाआड पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्नांची शिकस्त

या निमित्ताने देवळा तालुक्यातील उमराणे बाजारात सायंकाळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्र सरकार नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ (एनसीसीएफ) यांच्यामार्फत राज्यात तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. नाफेडच्या खरेदीला सुरुवात झाल्यामुळे घाऊक बाजारात काहिशी तेजी निर्माण होईल, ही शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली. कारण, या दिवशी बाजार समित्यांमध्ये दरात फारसे बदल झाले नाहीत. उलट लासलगाव बाजारात आदल्या दिवशीच्या तुलनेत दर २० रुपयांनी कमी झाले. बाजार समितीत १६ हजार ३९० क्विंटलची आवक झाली. त्यास क्विंटलला किमान ४०० ते कमाल १२४५ आणि सरासरी ८३० रुपये दर मिळाले.

हेही वाचा >>> नाशिक: अवैद्य व्यवसाय प्रतिबंध पथकावर सहा संशयितांचा हल्ला

आदल्या दिवशी सरासरी दर ८५० रुपये होते. इतर बाजार समित्यांमध्ये यापेक्षा वेगळे चित्र नसल्याचे सांगितले जाते. पहिल्या दिवशी नाफेडने किती कांदा खरेदी केली याची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. तथापि, नाफेडच्या खरेदीने घाऊक बाजारात किमान पहिल्या दिवशी फारसे बदल झाले नसल्याचे चित्र आहे. नाफेड चांगल्या प्रतीचा कांदा बाजारभावाने खरेदी करते. त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना कुठलाही लाभ होत नसल्याची तक्रार काही शेतकरी संघटना करतात.

घाऊक बाजारातील उन्हाळ कांद्याची आवक कमी होत असून चांगल्या प्रतीचा माल बाजारात येत आहे. सद्यस्थितीत नाफेडसाठी कार्यरत शेतकरी उत्पादक कंपन्या शेतात वा केंद्रावर कांदा खरेदी करतात. गेल्या वर्षीप्रमाणे नाफेडने प्रत्यक्ष बाजार समित्यांमध्ये खरेदी केल्यास नव्या खरेदीदारामुळे स्पर्धा निर्माण होईल. नाफेड चांगल्या प्रतीचा माल खरेदी करते. त्यांनी प्रत्यक्ष बाजार समितीत खरेदी केल्यास बाजारभावात तेजी येऊ शकते. – नरेंद्र वाढवणे (सचिव, लासलगाव बाजार समिती)

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 09:48 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×