शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी आणि अभियंता रवींद्र पाटील यांच्यात बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता पदावरुन चांगलेच खुर्ची नाट्य रंगले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बदलीला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून (मॅट) स्थगिती मिळवून घुगरी शुक्रवारी पुन्हा त्यांच्या मूळ पदावर रुजू झाल्या. तर त्याआधी त्यांच्या जागी अभियंता आर. आर. पाटील हे आसनस्थ होते. यामुळे एकाच दालनात दोन अधिकारी कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असल्याने बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. मूळ अधिकारी कोण, कोणाच्या आदेशांचे पालन करावे, असा प्रश्‍न कर्मचार्‍यांना पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नाशिक: प्रतिबंधित अन्न पदार्थांचा दोन कोटींचा साठा जप्त

येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांनी कार्यकारी अभियंता वर्षा घुगरींविरोधात आंदोलन केले होते. त्यांची बदली न झाल्यास लेखणीबंदचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर घुगरी यांची बदली धुळे महापालिकेच्या आस्थापनात करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर अभियंता आर.आर. पाटील यांची नियुक्ती झाली होती. यामुळे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा पदभार स्विकारला. मात्र, घुगरी यांनी त्यांच्या बदलीविरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली. तिथे सुनावणी होऊन त्यांच्या बदलीस स्थगिती मिळाली. त्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या मूळ पदावर हजर झाल्या. यावेळी त्यांनी बदलीच्या स्थगिती संदर्भातील आदेशाची प्रत अभियंता पाटील यांना देऊ केली. मात्र, त्यांनी ती प्रत स्वीकारली नाही. पाटील यांनीही घुगरी यांच्याच दालनात शेजारी एक टेबल आणि खुर्ची टाकून कामकाज केले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. दिवसभर हा गोंधळ सुरु होता.

हेही वाचा >>>नाशिक: भातोडे शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड

मला येथे दोन वर्ष सहा महिने झाले आहेत. नियमानुसार माझी बदली झाली नसून त्याला मी मॅटमध्ये आव्हान दिले. त्यानुसार मला मॅट कोर्टाने दिलासा दिला. न्यायाधिकरणाने माझ्या बदली आदेशाला स्थगिती दिली. मी न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार माझ्या पूर्वीच्या मूळ पदावर कार्यरत आहे. त्या आदेशाची प्रत मी रवींद्र पाटील यांना दिली. पण, त्यांनी ती स्विकारली नाही. मी नियमानुसार पदावर कार्यरत आहे.-वर्षा घुगरी (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे)

मी इथला नाही. मला वरुन आदेश आला, त्यानुसार मी या पदावर रुजू झालो. मी इथला नसून मी येथे राहत नाही. मी संगमनेरला होतो. मला काहीच माहीत नाही. पद्भाराबाबत मी काहीच सांगू शकत नाही. आता मी इथे बसलो आहे. –आर.आर.पाटील (अभियंता, धुळे)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute between two officers from the post of executive engineer amy
First published on: 30-12-2022 at 17:34 IST