राज्यातील ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून एक ते २३ एप्रिल या कालावधीत राज्यातील एक कोटी ५१ लाख १३ हजार ९९९ शिधापत्रिका धारकांना तब्बल ६२ लाख ३९ हजार ७३९ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठण्यात आला आहे. टाळेबंदीच्या काळात कोणी उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन थाळींची संख्या ५० हजारांनी वाढविण्यात आली आहे. राज्यात दररोज आता दीड लाख शिवभोजन थाळींचे वितरण होणार आहे.
याबाबतची माहिती अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे सात कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त
धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. या योजनांमधून सुमारे २० लाख दोन हजार ८९१ क्विंटल गहू, १५ लाख ४६ हजार ७७५ क्विंटल तांदूळ, तर १८ हजार ९५० क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. तसेच स्थलांतरीत झालेले परंतु टाळेबंदीत राज्यात अडकलेल्या सुमारे आठ लाख १८ हजार ३८० शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. तीन एप्रिलपासून एकूण एक कोटी १८ लाख १५ हजारहून अधिक शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ वाटप केले आहे. या शिधापत्रिकावरील पाच कोटी ३८ लाख एक हजारहून अधिक लोकसंख्येला २६ लाख ९० हजार ७० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे. या योजनेसाठी ३५ लाख ८२० क्विंटल तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे.
राज्यात आता दररोज दीड लाख शिवभोजन थाळी
करोनाच्या पार्श्वभूमीवर, निर्माण झालेल्या परिस्थितीत हाताला काम नसल्याने गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे. या थाळींची संख्या पुन्हा नव्याने ५० हजारांनी वाढविण्यात आली आहे. दररोज सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत पाच रुपये थाळी याप्रमाणे ती उपलब्ध असेल. याआधी एक लाख थाळींचे वितरण केले जात होते. टाळेबंदीमुळे यामध्ये वाढ करत शिवभोजन थाळीची संख्या दीड लाख करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. या योजनेसाठी शासनाने यापूर्वीच १६० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. टाळेबंदीच्या काळात दोन मेपर्यंत वाढीव शिवभोजन थाळी योजनेचा लाभ सुरू राहणार आहे.