|| चारुशीला कुलकर्णी
आजतागयत २६ हजार बालकांना केंद्राचा लाभ :- आदिवासीबहुल भागातील कुपोषण, गरोदरमातांमधील रक्ताक्षयासह अन्य आजार यामुळे माता आणि बालमृत्यूचे प्रमाण वाढत असताना ते रोखण्यासाठी ‘जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ उपयुक्त ठरत आहे. आजवर २६ हजार बालकांना या केंद्राचा लाभ झाला आहे.
आदिवासी भागातील गरोदर मातांचे प्रश्न, गरोदरपणात त्यांना होणारा त्रास, घरीच प्रसूती होत असल्याने उपचारांअभावी तसेच अन्य कारणांमुळे बाळाला असणारे व्यंग याचा विचार करता आरोग्य विभाग या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा रुग्णालयात वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून आदिवासी तसेच लाभार्थी गरोदर मातांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न होत आहे.
यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘माता बाल संगोपन केंद्र’ महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. याअंतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राच्या माध्यमातून शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी होत आहे. विशेषत: नवजात शिशूच्या पहिल्या हजार दिवसांमध्ये केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. दुसरीकडे काही वर्षांत निश्चित कालावधीआधीच बाळंतपण होण्याचे प्रमाण वाढले आहे. आकडेवारीनुसार २० टक्के महिला या थॉयरॉईड, रक्तदाब, ताणतणाव यासह अन्य काही कारणांमुळे वेळेआधीच प्रसूती होत आहेत. यामुळे काही बालकांचे शरीर आणि मेंदू यांचा अपेक्षित विकास होत नसल्याने जन्मत: बालकांना वेगवेगळ्या व्याधी होण्याचा संभव असतो.
या पाश्र्वभूमीवर केंद्राच्या माध्यमातून जन्मत: व्यंग, पोषणमूल्याची कमतरता, शारीरिक आणि मानसिक विकासात्मक विलंब, आजार याविषयी संदर्भिय सेवा केंद्रातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. बालकाच्या शारीरिक स्थितीनुसार त्याला अतिदक्षता कक्ष, रुग्णालयातील बाल विभागात दाखल करण्यात येते. सर्वसामान्य बालकांप्रमाणे ते आहे की नाही याची वैद्यकीय तपासणी या ठिकाणी होते. या बालकांवर देखरेखीसाठी जनरल वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १४ जणांचा चमू देखरेख करत असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली.
असा झाला केंद्राचा प्रवास
जिल्हा रुग्णालयात २०१५ मध्ये ही सेवा सुरू झाली. जिल्हा परिसरात महापालिका किंवा खासगी रुग्णालयात अशी कुठलीच सेवा नाही. आजवर या केंद्राचा लाभ २६ हजार ४३७ बालकांनी घेतला आहे. नोव्हेंबरअखेपर्यंत ७६८ महिला जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूत झाल्या. त्यातील ७३३ बालके जीवित असून १५ बालकांचे वजन हे एक हजार ते एक हजार ४९९ ग्रॅम इतके आहे. तसेच ३७ बालके ही वेळेआधीच जन्माला आली. यातील ६९ बालकांवर केंद्राच्या माध्यमातून उपचार होत आहेत. तर बाहेरून वेगवेगळ्या कारणांमुळे ६६ बालके दाखल झाली आहेत. काहींना एक दिवसाच्या उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. ९० नवजात शिशू सात दिवसांहून अधिक काळ या केंद्रात उपचार घेत आहेत. यामध्ये आदिवासी भागातील बालकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे केंद्राच्या व्यवस्थापक डॉ. दीपा माळवे यांनी सांगितले.