दोन्ही गटाच्या दहा जणांना अटक
पंचवटीतील औरंगाबाद रस्त्यावरील निलगिरी बाग परिसरात गुरुवारी रात्री दांडिया खेळण्यावरून दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर परस्परांच्या इमारतींवर दगडफेक, वाहनांची तोडफोड आणि तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला चढविण्यात झाले. त्यात दोन ते तीन महिलांसह पाच जण जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परांविरोधात तक्रारी दिल्यानंतर आडगाव पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेच्या घरकुल योजनेच्या दहा इमारतींच्या प्रकल्पात ही घटना घडली. दोन्ही गटांतील धुमश्चक्रीमागे दांडियाचे कारण दिले जात असले तरी घरकुल वितरणात इमारतीच्या मुद्दय़ावरून स्थानिक आणि बाहेरून आलेले असे काही वाद असल्याचे सांगितले जाते. या धुसफुशीला दांडियाचे निमित्त मिळाले आणि दोन्ही गटांनी परस्परांच्या इमारतींची नासधूस केली.
जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेंतर्गत नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील निलगिरी बाग येथे पालिकेने दहा इमारतींचा प्रकल्प साकारला आहे. साधारणत: वर्षभरापूर्वी या इमारतीतील सदनिकांचे स्थानिक झोपडपट्टीधारकांसह पंचवटीतील अंबिकानगर, गणेशवाडी आसपासच्या झोपडपट्टय़ांमधील नागरिकांना वितरण करण्यात आले. प्रकल्पातील विशिष्ट इमारत मिळावी, असा स्थानिकांचा आग्रह होता. मात्र ही मागणी मान्य न झाल्यामुळे वास्तव्यास आल्यापासून स्थानिक आणि बाहेरून आलेल्यांमध्ये बेबनावाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. त्याचे भयावह स्वरूप गुरुवारी रात्री पाहावयास मिळाले. मरीमाता मंदिरालगत आयोजित दांडिया सोहळ्यात गाणे वाजविण्यावरून वाद झाला. त्याचे पडसाद गृहनिर्माण प्रकल्पातील इमारत क्रमांक पाच आणि सहामध्ये उमटले. दोन्ही इमारतींतील गटांनी परस्परांवर तुफान दगडफेक केली. चार मजली इमारतीतील खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. बाहेर उभ्या असणाऱ्या दुचाकी आणि अन्य वाहनांची तोडफोड करण्यात आली. दगडांचा इतका मारा झाला की, अनेकांच्या घरात दगडे येऊन काही महिला जखमी झाल्या. दोन्ही इमारतींबाहेर काचांचा अक्षरश: खच पडला होता. जवळपास अर्धा ते पाऊण तास दोन्ही गटांचा धुडगूस सुरू होता. त्यात संजय सदावर्ते, दीपक व भरत वळवी यांच्यासह काही महिलाही जखमी झाल्या. दोन्ही गटांनी तीक्ष्ण हत्यारांचा मुक्तहस्ते वापर केला. रात्री अचानक घडलेल्या या प्रकाराने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. लहान मुले व महिला भयभीत झाल्या.
या घटनेची माहिती समजल्यानंतर आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेत जखमी झालेले संजय सदावर्ते यांनी तक्रार दिली आहे. संशयित दीपक वळवी व त्याच्या १० ते १५ साथीदारांनी दांडिया खेळण्यावरून झालेल्या वादातून मारहाण केल्याचे म्हटले आहे, तर दीपक वळवी यांनी संजय ऊर्फ भिष्मा सदावर्दे, दत्तुचंद सोनवणे व त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. दोन्ही इमारतीतील वादात आसपासच्या इमारतीतील रहिवासी भरडले गेले. वरिष्ठांनी बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. या प्रकरणी दोन्ही गटांच्या दहा जणांना अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Oct 2015 रोजी प्रकाशित
दांडियातील वादावरून निलगिरी बागमध्ये दंगल
धुसफुशीला दांडियाचे निमित्त मिळाले आणि दोन्ही गटांनी परस्परांच्या इमारतींची नासधूस केली.
Written by मंदार गुरव

First published on: 17-10-2015 at 04:09 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disturbance in nilgiri bag because of dandiya