नाशिक विभागीय मान्सूनपूर्व आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांची तंबी
नाशिक : मान्सून काळात कुठल्याही प्रकारची वित्त आणि जीवितहानी होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यासह विभागातील सर्व जिल्हा प्रशासनांनी साथरोग आणि करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याबाबत सतर्कता बाळगावी. त्यासाठी सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेऊन नियोजन करावे. मान्सून काळात करावयाचे कोणतेही काम दुर्लक्षित होणार नाही याकडे सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांनी नियोजनपूर्वक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिल्या आहेत.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीविषयी दृकश्राव्य माध्यमाव्दारे आयोजित विभागातील पाचही जिल्ह्य़ांच्या आढावा बैठकीत माने बोलत होते. यावेळी दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, अर्जुन चिखले, संगीता धायगुड या उपायुक्तांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजीत हांडे, जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे आदी उपस्थित होते.
आपआपल्या जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा इतिहास लक्षात घेऊन कुठल्याही प्रकारची वित्त आणि जीवितहानी होणार नाही, यासाठी सर्व जिल्ह्यांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. जिल्हानिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्यावत करावेत, जिल्हास्तरावरील प्रत्येक विभागाने आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीप्रमाणे आपली माहिती अद्ययावत करावी, प्रत्येक जिल्ह्यातील मान्सून उपाययोजना संबंधित पोलीस विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, बीएसएनएल, लघु पाटबंधारे, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका येथे २४ तासांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, संभाव्य आपत्तीबाबत सुधारित आपत्कालीन आराखडा तयार करावा, पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा पातळीवर आवश्यक बचाव साहित्यांचा आढावा घ्यावा, नियंत्रण कक्षात आवश्यक सर्व यंत्रणांचे दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच इतर संपर्कमाध्यमे अद्ययावत करण्यात यावेत, अशा सूचना यावेळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक जिल्ह्यातील महानगरपालिकांमार्फत पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले आणि गटार सफाई मोहीम हाती घेण्यात यावी, तसेच साथीचे रोग पसरू नये यासाठी आवश्यक औषधांची फवारणी करण्यात यावी, करोना पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथीचे रोग पसरू नये, यासाठी पुरेसा औषधसाठा, पुरेशा रुग्णवाहिका, आरोग्य पथके याबाबत जिल्हा पातळीवर नियोजन करावे. त्याचप्रमाणे विद्युत विभागामार्फत रोहित्र, विद्युत खांब, वायर यांची दुरुस्ती करावी, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दुरूस्ती पथकांची नेमणूक करावी. जिल्ह्यात कार्यरत गृहरक्षकांची यादी अद्ययावत करून आपत्तीच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण मिळवणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळणीविषयीचे प्रशिक्षण द्यावे, असेही सांगण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या शोध आणि बचाव साहित्यामधील रबरी फायबर बोट, लाईफ जॅकेट्स आवश्यकतेनुसार उपलब्ध आहेत किंवा नाही याबाबत खात्री करावी. प्रत्येक जिल्ह्यातील एनआयसीद्वारे जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर पावसाची अद्यावत माहिती भरण्यात यावी. जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात येणाऱ्या संभाव्य आपत्तीबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना यावेळी सादरीकरणाद्वारे विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत. यानंतर करोना विषाणूच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला.
विभागातील संभाव्य पूरग्रस्त गावे
नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगांव या पाचही जिल्ह्यांमधून काही संभाव्य पूरग्रस्त गावे आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि निफाड तालुका, अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवासा आणि शेवगांव, धुळे जिल्ह्यात धुळे तालुका, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री, नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नवापूर, अक्कलकुवा, जळगांव जिल्ह्यात जळगांव आणि भुसावळ या तालुक्यांमधील गावांचा समावेश आहे.