नाशिक : एमडी या अंमली पदार्थाची तस्करी प्रकरणातील बहुचर्चित फरार ललित पाटीलचा शिंदे गाव औद्योगिक वसाहतीत असलेला अंमली पदार्थांचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उदध्वस्त करुन कोट्यवधी रुपयांच्या साठ्यासह एका संशयितास ताब्यात घेतले आहे. साकीनाका पोलिसांनी दोन महिन्यापूर्वी अंमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल केला होता. त्यांनी एका संशयिताला ताब्यातही घेतले होते. त्याच्या माहितीवरुन साकीनाका पोलिसांनी नाशिकरोड पोलिसांची मदत घेत शिंदे गाव एमआयडीसीत असलेल्या एमडी या अंमली पदार्थ बनविणाऱ्या कारखान्यावर बुधवारी रात्री छापा घेतला.
हा कारखाना ललित पाटीलचा लहान भाऊ भूषण पाटील चालवत होता. तो त्या ठिकाणी कच्चा माल आणत असे. सदरची जागा ही यादव नामक व्यक्तीच्या मालकीची असून ललितने ती भाडेतत्वावर घेतली होती. त्या ठिकाणी भूषण पाटील हा माल तयार करायचा. त्यास जिशान शेख (२६) या कामगाराचे सहकार्य मिळत होते. त्यास साकीनाका पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून एक किलो ८०० ग्रॅम एमडी आणि ते तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा कोट्यवधींचा माल हस्तगत करण्यात आला.
हेही वाचा >>> नाशिक ग्रामीण पोलिसांचे अवैध व्यवसायविरोधी अभियान
ललित हा पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर भूषण पाटीलने कारखान्यातील तयार माल आणि सामग्री लंपास केली असावी, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली. साकीनाका पोलीस तीन दिवसांपासून नाशिकरोड परिसरात तळ ठोकून होते. अंमली पदार्थांचा कारखाना चालू असताना स्थानिक पोलिसांना त्याची माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.