नंदुरबार – एका मनोरुग्णामुळे जवळपास दीड तास रेल्वे वाहतूक खोळंबल्याचा प्रकार नंदुरबार रेल्वे स्थानकात घडला. रेल्वेची उच्चदाब विद्युत वाहिनी असलेल्या खांबावर चढलेल्या मनोरुग्णाला वाचवण्यासाठी रेल्वे वाहतूक बंद ठेवावी लागली. विशेष प्रयत्न करुन त्याला खाली उतरविण्यात आले.

नंदुरबार रेल्वे स्थानकात सकाळी १० वाजेच्या सुमारास एक जण रेल्वेला विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावर चढल्याने एकच धावपळ उडाली. संबंधित प्रकार लोहमार्ग पोलिसांच्या लक्षात येताच सहायक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. परंतु, यात संबंधिताच्या जीवाला धोका असल्याचे ओळखून स्थानकप्रमुखाच्या मदतीने उच्च दाबाचा वीज पुरवठा तत्काळ खंडित करण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यक्तीला समजाविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो उतरण्यास तयार नव्हता. रेल्वेच्या उच्चदाब विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावर चढलेला हा युवक उत्तर प्रदेशातील गोरखपूरचा रहिवासी असून रागातून तो घर सोडून निघून आल्याचे उघड झाले. जवळपास दीड तासांच्या प्रयत्नानंतर रेल्वे प्रशासनाने याठिकाणी ओएचचा विशेष डबा मागवून शिडीच्या सहाय्याने डब्यावर त्याला उतरविण्यात आले. नंतर रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेवून त्याची चौकशी केली.

हेही वाचा – मागण्यांसाठी धुळ्यात कामगार संघटनेचे आंदोलन

हेही वाचा – मालेगाव : अद्वय हिरेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, कोठडीतला मुक्काम वाढला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित युवकास वाचविण्यासाठी रेल्वेचा उच्चदाब विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे सुरत-जळगाव मार्गावरील ठिकठिकाणच्या स्थानकांवर रेल्वे गाड्या थांबून राहिल्या.