विहिरी आणि कूपनलिकेतील पाणी पिकांसह पिण्यासाठीही धोकादायक; केटीएचएमच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे संशोधन

पाथर्डी परिसरातील महानगरपालिकेच्या खत प्रकल्पात साचलेल्या डोंगराएवढय़ा कचऱ्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे सभोवतालच्या विहिरी आणि कूपनलिकेतील पाणी कमालीचे प्रदूषित झाले असून ते पिण्यासह अन्य कोणत्याही कामांस वापरणे धोकादायक असल्याचा निष्कर्ष केटीएचएम महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या संशोधनातून पुढे आला आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पाच्या आसपासच्या परिसरात त्याचा पिण्यासह शेतीसाठीही वापर केला जातो. असंख्य जिवाणू सामावलेल्या पाण्यातून द्राक्ष, ऊस, भाजीपाला आदींचे उत्पादन घेतले जाते. हा कृषिमाल शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. त्याच्या सेवनाने गंभीर आजार जडण्याचा धोका नाशिककरांवर घोंघावत असल्याकडे या क्षेत्रातील जाणकार लक्ष वेधत आहेत.

महापालिका स्थापन झाल्यानंतर आडगाव नाका परिसरात कचरा आगार करण्यात आले होते. नागरी वस्ती वाढल्यावर विरोध होऊ लागल्याने आगार विल्होळी येथील जागेत स्थलांतरित करण्यात आले. अनेक वर्षांपासून याच परिसरात कचरा साठविला जात आहे. कचऱ्यापासून खत, कांडी कोळसा, वीटनिर्मिती तसेच चाचणीच्या टप्प्यात असलेला वीज प्रकल्प, प्लास्टिक कचऱ्यापासून ‘फर्नेस ऑइल’ तयार करणे असे प्रकल्प प्रगतिपथावर असले तरी दररोज संकलित होणारा आणि विल्हेवाट लागणारा कचरा यात कमालीची तफावत आहे. यामुळे खत प्रकल्पात कचऱ्याचे डोंगराएवढे ढीग दृश्षिपथास पडतात. अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची घडी काही अंशी व्यवस्थित बसलेली वाटते. कचऱ्याची काही अंशी सुकरपणे विल्हेवाट लागत आहे. परंतु, या व्यवस्थेत काही त्रुटी असून कचरा आगारामुळे प्रदूषणाचे गंभीर संकट उभे ठाकले असल्याकडे सूक्ष्मजीवशास्त्र पदवीचे शिक्षण घेणाऱ्या शीतल दशपुत्रे, हर्षदा पाटील या विद्यार्थिनींच्या संशोधनातून लक्ष वेधण्यात आले आहे. भाजप नगरसेवक शशिकांत जाधव यांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रदूषणामुळे निर्माण झालेली भयावह स्थिती मांडली होती. खत प्रकल्पाच्या सभोवताली पाथर्डी, गौळाणे, पिंपळगाव खांब आदी गावांसह शहरातील काही भाग समाविष्ट होतो. संशोधकांनी वर्षभराच्या कालावधीत दोन टप्प्यांत अभ्यास केला. त्या अंतर्गत पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यानंतर उपरोक्त परिसरातील १० विहिरींतील पाण्याचे स्वतंत्रपणे नमुने घेण्यात आले. त्याचे सूक्ष्मजीवशास्त्रीय विश्लेषण केले असता त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.पावसाळ्यात कचऱ्याच्या ढिगातून पाझरणारे पाणी परिसरातील विहिरी, कूपनलिकांमध्ये उतरते. खत प्रकल्पात मिथेन वायूचा दर्प येत असतो. तोदेखील आरोग्यासाठी हानीकारक आहे. या पाण्यात अनेक गंभीर घटक आहेत. सर्वसाधारणपणे पिण्यासाठी प्रति लिटर पाण्यात एक ते दोन एमजी प्राणवायूचे प्रमाण योग्य मानले जाते. विहिरींमधील पाण्यात हे प्रमाण पावसाळ्याआधी किमान पाच ते कमाल १२.१६ आणि पावसाळ्यानंतर किमान आठ आणि कमाल २० एमजीपर्यंत गेल्याचे लक्षात आले. हीच स्थिती जिवाणूंच्या संख्येची. सर्वसाधारणपणे १०० मिलीग्रॅम पाण्यात २५० जिवाणू असतात. या विहिरीतील पाण्यात हे प्रमाण धडकी भरवणारे म्हणजे तब्बल किमान ९०० ते कमाल ३५०० इतके असल्याचे आढळले. त्यातील जिवंत जिवाणूंची संख्या विहीरनिहाय किमान १५० ते कमाल १२०० पर्यंत आढळली. त्यामुळे वेगवेगळे आजार जडण्याची शक्यता आहे. या पाण्याचा स्थानिक पिण्यासह शेतीसाठी वापर करतात. त्यामुळे वेगवेगळे आजार जडण्याचा धोका आहे. प्रदूषित पाण्याचा पिकांवर काय परिणाम होत आहे, याची शहानिशा करण्यासाठी महापालिकेने रासायनिक विश्लेषण करण्याची गरज आहे. पाथर्डी खत प्रकल्पाच्या सभोवताली ही स्थिती असताना याच कालावधीत मखमलाबाद शिवारातील विहिरींतील पाण्याची त्याच निकषावर तपासणी करण्यात आली. त्यात पाथर्डीच्या तुलनेत विहिरींच्या पाण्याची स्थिती चांगली असल्याचे निष्पन्न झाले.

मखमलाबाद परिसरात स्थिती योग्य

खत कचरा प्रकल्पाच्या सभोवतालच्या विहिरींमधील पाण्याचे नमुने घेऊन केलेल्या सूक्ष्मजीवशास्त्रीय संशोधनात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. विहिरीतील पाण्यात सिडो मोनाय, इंटरोबॅक्टर, पाल्मोनेना, इ कोलाय, शिगेला आदी धोकादायक जिवाणू आढळले. या पाण्याचा पिण्यासह फळबागा, भाजीपाला या पिकांसाठी वापर केला जातो. पावसाळ्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मोठय़ा प्रमाणात पाणी झिरपते. यामुळे पावसाळ्याआधी विहिरींमधील दूषित असणारे पाणी पावसाळ्यानंतर केलेल्या परीक्षणात अधिक दूषित झाल्याचे निष्पन्न झाले. मखमलाबाद शिवारातील विहिरींमध्ये या उलट स्थिती आहे. तेथील पाणी तुलनेत चांगले आहे

– शीतल दशपुत्रे, हर्षदा पाटील, संशोधक विद्यार्थिनी

महापालिकेने सजग होण्याची गरज

महापालिका स्थापन झाल्यानंतर आडगाव नाका परिसरात कचरा आगार करण्यात आले होते. नागरी वस्ती वाढल्यावर विरोध होऊ लागल्याने नंतर हे आगार विल्होळी येथे स्थलांतरित करण्यात आले. प्रदीर्घ काळापासून साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडविण्याची महानगरपालिकेची जबाबदारी आहे. कचऱ्याच्या डोंगरांवर कधी प्रक्रिया करणार, डोंगरांची साफसफाई झाली तरी जमिनीत खोलवर पोहोचलेल्या विषारी घटकांचे काय, या प्रश्नांवर उत्तर शोधणे आवश्यक आहे. पाथर्डीसह आसपासच्या गावांमध्ये विहिरी, कूपनलिकांतील पाण्याचा वापर केला जातो. हे पाणी शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे होणारे परिणाम जाणून घेण्याकरिता खत प्रकल्पाच्या सभोवताली काही किलोमीटरच्या परिघातील विहिरी, कूपनलिका यातील पाण्याची तपासणी करून त्याचे रासायनिक परीक्षण होणे गरजेचे आहे. सुमारे एक लाख नागरिक या परिसरात वास्तव्यास आहेत. निष्कर्षांच्या आधारे स्थानिकांना हे पाणी वापरू नये, असा सल्ला दिला गेला पाहिजे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सहा महिन्यांत कचऱ्याचे ढिग कमी करून त्यावर प्रक्रिया करण्याचे आशॉनासन दिले आहे.

 शशिकांत जाधव, नगरसेवक

दूषित पाण्यातील कृषिमाल आरोग्यास घातक

खत प्रकल्पाच्या कचऱ्याच्या ढिगातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे सभोवतालच्या विहिरींचे पाणी कमालीचे दूषित झाल्याचे विद्यार्थ्यांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. चाचण्यांचे निष्कर्ष हे पाणी पिण्यासह शेतीलाही वापरण्यायोग्य नसल्याचे दर्शवितात. मोठय़ा प्रमाणात धोकायक जिवाणू असणारे हे पाणी अतिक्षारयुक्त आहे. पिकांसाठी त्याचा वापर होत असल्याने मानवी आरोग्यासाठी ते धोकादायक आहे. अशा पाण्यातून उत्पादित कृषिमाल सेवन केल्याने गंभीर आजाराची लागण होऊ शकते. कर्करोग, त्वचारोग, अनैसर्गिक प्रसूती, व्यंग आदींचा धोका आहे. प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या या समस्येचा परस्पर संबंध जाणून घेण्यासाठी तातडीने रासायनिक परीक्षण करायला हवे. खत प्रकल्पातील कचऱ्याचे ढीग वाढणार नाही. दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लागेल याची दक्षता घ्यायला हवी. ओल्या कचऱ्याची सोसायटीनिहाय जागेवर विल्हेवाट लावण्याची व्यवस्था उभारणे आवश्यक आहे.

– डॉ. प्रतिमा वाघ, विभागप्रमुख, सुक्ष्मजीवशास्त्र, केटीएचएम महाविद्यालय