नाशिक – विद्यार्थी विश्वात स्पर्धा परीक्षांची तयारी करताना महाविद्यालयीन ग्रंथालयासह सार्वजनिक अभ्यासिका महत्वपूर्ण भूमिका निभावतात. येथील सार्वजनिक वाचनालयाची पानसे अभ्यासिका यापैकी एक. नाममात्र शुल्क आकारून विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली अभ्यासिका सध्या कात टाकत आहे. अभ्यासिकेत लवकरच आसन व्यवस्थेसह अन्य बदल होत आहेत. अभ्यासिकेचे प्रवेशद्वार आता बदलण्यात येत असून ई प्रवेशद्वार करण्यात आले आहे.

सार्वजनिक वाचनालय साहित्यासह कला, संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करत असताना गेल्या काही वर्षांत कात टाकू पाहत आहे. वाचनालयाच्या वतीने लायब्ररी ऑन व्हील उपक्रम राबवून आधुनिकीकरणाची नांदी सादर करण्यात आली. हा उपक्रम अद्याप प्रत्यक्षात सुरू झाला नसला तरी लवकरच वाचकांच्या भेटीला येईल, असा दावा वाचनालयाच्या वतीने केला जात आहे. वाचनालयाच्या कार्यकारिणीने वेगवेगळी कामे हाती घेतली असताना पानसे अभ्यासिकेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सद्यस्थितीत दोनशेहून अधिक विद्यार्थी अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत.

हेही वाचा – जळगाव : वाळूमाफियांची मुजोरी; यावलला मंडळ अधिकार्‍यांवरील हल्ल्याचा निषेध

वाचनालयाच्या वरील भागात काही मुलीही अभ्यास करीत आहेत. परंतु, अभ्यासिकेत येणारे विद्यार्थी सभासद आहेत किंवा नाही, यासह त्यांचा अन्य तपशील जमा करून अभ्यासिकेत असताना त्यांच्यावर नियंत्रण रहावे यासाठी वाचनालयाच्या बाहेर सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र त्याच्या सेवानिवृत्तीनंतर येथील कामकाजावर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर अभ्यासिकेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, अभ्यासिकेत नियमित विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतरांनी प्रवेश करू नये, यासाठी अभ्यासिकेच्या प्रवेशद्वारावर ६० हजारांहून अधिक रुपये खर्च करून ई प्रवेशद्वार सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा – कॉलेज रोड, गंगापूर रस्त्यावर एकेरी वाहतुकीची गरज; कोंडी फोडण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर नियोजन आवश्यक; राष्ट्रवादीचे पोलिसांना साकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभ्यासिकेच्या दारात या ई प्रवेशव्दाराची व्यवस्था करण्यात आली आहे. अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बोटाचे ठसे जुळले तरच त्यास आतमध्ये प्रवेश मिळतो. अन्यथा त्या विद्यार्थ्याला बाहेर थांबावे लागते. आठ दिवसांपूर्वी हे प्रवेशव्दार बसविण्यात आले आहे. अर्थात असे असले तरी विद्यार्थ्यांकडून यातूनही काही पळवाटा शोधल्या जात आहेत. याबाबत वाचनालय ठोस पावले उचलत असून अभ्यासिकेत आसन व्यवस्था आणि अन्य आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी सावानाकडून प्रयत्न सुरू आहेत.