जळगाव : जे झाले ते खूप झाले, मला त्रास होतोय, हे थांबवून घ्या, झालं-गेलं विसरून जा, बसून मिटवून टाकू, असे नाथाभाऊ बोलले होते. हे बोलले की नाही, हे त्यांनी आपल्यासमोर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सांगावे, असे आव्हान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांना दिले आहे.

खडसे आणि महाजन यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भुसावळ येथे मंगळवारी आयोजित एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला. नाशिक येथील कार्यक्रमात खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात जे असेल ते मिटवून टाकू हेच सांगितले असून, याचा आपल्याकडे कोणताही पुरावा नसल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. शिरपूर येथे सोमवारी आयोजित सत्कार सोहळ्यात महाजन यांनी यासंदर्भातील कानगोष्टीची ध्वनिफित उपलब्ध असल्याचा दावा केला होता. परंतु, दुसऱ्याच दिवशी त्यांनी ध्वनिफित नसल्याचे सांगून घूमजाव केले.

हेही वाचा : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी स्फूर्तिगीत

यासंदर्भातील छायाचित्र होते, ते टीव्हीवर दिसून आले. ध्वनिफित नाही. नाथाभाऊंचे बोलणे मुद्रित झालेले नाही. परंतु, आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही, असे महाजन यांनी नमूद केले. अमित शहांनी खडसेंना भेट नाकारली हे सत्य आहे. रक्षाताईंनीच आपणास ही माहिती दिली, या विधानाचा मंत्री महाजन यांनी पुनरुच्चार केला.खडसे कशासाठी गेले होते, त्यांना काही अडचणी मांडायच्या होत्या का, अमित शहांना का भेटायचे होते, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे महाजन यांनी सांगितले. जे काही मिटवायचे असेल, त्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील. आम्ही सर्व फडणवीस यांच्या निकटचेच आहोत, ते राज्याचे नेते आहेत, असे महाजन यांनी सांगितले.