या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात वादळी वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पावसाने शहरासह जिल्ह्य़ातील काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या पाश्र्वभूमीवर, नाशिक शहरात चार तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा बंद झालेल्या सर्व वीजग्राहकांना प्रति तास ५० रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा ग्राहक पंचायतीने केली आहे.

शहरात सध्या वीज वितरण कंपनी मान्सून पूर्व कामे करीत आहे. मे महिन्यात पहिल्या पावसात वीजपुरवठा किमान सहा ते कमाल ३६ तास खंडित राहिला. यामुळे वीजग्राहकांना नाहक मनस्ताप सोसावा लागला. मागील वर्षी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुढील वर्षी पाऊस पडला तरी वीज जाणार नाही, वीजसेवा विस्कळीत होणार नाही, असा दावा केला होता. त्याठी वीज कंपनीने सिंहस्थासाठी केलेल्या कामांचा संदर्भ देण्यात आला. परंतु ८ मे रोजी शहरात दुपारी झालेल्या पावसात वीज कंपनीचे दावे फोल ठरले. दुपारी साडेचार वाजता गंगापूर रोड ते सावरकरनगर, कॉलेज रोड, सातपूर आयटीआय चौक, माघ सेक्टर येथील वीजपुरवठा बंद झाला. काही भागात तो पुन्हा रात्री १२ वाजता तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सायंकाळी पूर्ववत झाला. सिंहस्थात वीज वितरणप्रणाली सुधारणा करण्यासाठी सुमारे कोटय़वधी रुपये खर्च केले गेले. तरीदेखील पावसात वीज वितरण व्यवस्था कोलमडली. वीज कायद्यान्वये शहरात चार तासापेक्षा अधिक काळ वीजपुरवठा बंद राहिल्यास प्रति तास ग्राहकांना ५० रुपये भरपाई मिळते. म्हणजेच वरील वीज बंद काळात ६०० ते १४०० प्रति ग्राहक भरपाई मिळण्याचे अर्ज सर्वानी दाखल करावेत, असे आवाहन ग्राहक पंचायतीचे विलास देवळे, कृष्णा गडकरी, अनिल नांदोडे यांनी केले आहे. हे तक्रार अर्ज ग्राहकांना भारत फूड प्रॉडक्ट्स (सावरकरनगर), अंजली स्टोअर्स (कॉलेज रोड), सप्तश्रृंगी डेअरी (इंदिरानगर), आदर्श स्टोअर्स (सीबीएस) येथे मिळतील. जून महिन्यात पाऊस पडल्यावर चार तासापेक्षा जास्त काळ वीज पुरवठा खंडित राहिल्यास ग्राहकांनी तक्रार अर्ज वीज वितरण कंपनी व ग्राहक पंचायतीस करावे. अधिक  माहितीसाठी ९४२२२ ६६१३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity issue in nashik
First published on: 27-05-2016 at 03:04 IST