नाशिक: देवळा, निफाड आणि दिंडोरी नगर पंचायतीतील आठ जागांसाठी मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत करोनाचे सावट असतानाही मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीनपर्यंत ६७.८८ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या पेचामुळे मागील महिन्यात या जागांसाठी निवडणूक होऊ शकली नव्हती. नगर पंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मंगळवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान झाले. करोना संदर्भातील नियमावलीचे पालन करीत मतदार मतदानास घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. उपरोक्त नगर पंचायतींमध्ये काही उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे आठ जागांसाठी निवडणूक पार पडली. यात देवळा आणि निफाड नगर पंचायतीत प्रत्येकी तीन तर दिंडोरीतील दोन जागांचा समावेश आहे. सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत देवळा नगर पंचायतीच्या निवडणुकीत ७३.०९ टक्के मतदान झाले. निफाड नगरपंचायतीसाठी ६२.०२ टक्के तर दिंडोरी नगरपंचायतीतील दोन प्रभागांत ७३.८५ टक्के मतदान झाले. सायंकाळपर्यंत टक्केवारीत आणखी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर जिल्ह्यात सर्वसामान्यांचे मत जमाविणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही लक्ष आहे. निकाल विरोधात गेल्यास महाविकास आघाडीला तो धक्का समजला जाईल. तर, राज्यातील विरोधक भाजप त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी अधिक आक्रमकपणे व्यूहरचना करू शकेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enthusiasm of voters in nagar panchayat elections zws
First published on: 19-01-2022 at 02:05 IST