नाशिक – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. स्वतंत्रपणे लढलो तरी महायुतीला सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) महानगरप्रमुखांच्या समन्वय बैठकीत करण्यात आला.

नाशिक महापालिकेत याआधी भाजपची एकहाती सत्ता होती. जवळपास ६५ जागा त्यांच्याकडे होत्या. तेव्हा एकसंघ शिवसेनेकडे ३५ जागा होत्या. विरोधी पक्ष म्हणून त्यांना काम करावे लागले. एकसंघ राष्ट्रवादीचे जेमतेम सहा संख्याबळ होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सर्वच समीकरणे बदलली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून ठाकरे गटासह विरोधी पक्षातील माजी नगरसेवकांना गळाला लावले जात आहे. भाजप आणि शिंदे गट महापालिकेत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी जोरदार तयारी करीत आहे. लोकसभा, विधानसभेप्रमाणे महायुतीतील तिन्ही पक्षांचे महापालिका निवडणुकीत एकत्र येणे अशक्य मानले जाते. असा निर्णय म्हणजे उत्साही इच्छुकांच्या इच्छा, आकांक्षांवर पाणी फेरणारा ठरणार आहे. या परिस्थितीत महायुतीतील तिन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांची समन्वय बैठक राष्ट्रवादी भवनमध्ये पार पडली. यावेळी महापालिका निवडणुकीवर चर्चा करण्यात आली.

स्थानिक पातळीवर समन्वयाचा निश्चय

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार जनताभिमुख कामे करीत आहे. महायुती सरकारप्रमाणेच तिन्ही पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचा निश्चय केला असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आणि शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीत घटक पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात स्थानिक पातळीवरही समन्वय, सुसंवाद असावा यासाठीच ही एकत्रित समन्वय बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जाते. महायुती सरकारची विकास कामे, शासन निर्णयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविणे, नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तिन्ही पक्षांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणे, स्थानिक पातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय आणि सुसंवाद वाढविणे आदी विषयांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे भाजपचे शहराध्यक्ष केदार, अजित पवार गटाचे शहराध्यक्ष ठाकरे आणि शिंदे गटाचे महानगरप्रमुख तिदमे यांनी नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीत लढण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. स्वतंत्र लढण्याचा विचार झाला तरी महायुतीला सत्ता मिळविण्यासाठीच प्रयत्न करण्याचा निर्धार तिघांनी व्यक्त केला.