नाशिक : पहलगाम हल्ला आणि पश्चिम बंगालमधील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सिडकोत बुधवारी ‘हिंदू विराट सभा’ आयोजित करण्यात आली होती. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने आयोजित या सभेत कुख्यात गुंड लाॅरेन्स बिष्णोई याचे छायाचित्र काही जणांनी झळकावल्याने टीका होत आहे. या प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दखल घेतली असून छायाचित्र झळकाविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
आ. गोपीचंद पडळकर यांनी सभेत मार्गदर्शन केले. ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर अशा विषयांवर त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. सभा सुरू असतांना कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे छायाचित्र असलेले फलक काही जणांनी झळकाविले. या प्रकाराविषयी स्थानिक अंबड पोलिसांनी गुरुवारी दुपारपर्यंत कोणतीही दखल घेतली नव्हती. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात या प्रकाराविषयी प्रतिक्रिया देताना बिष्णोईसारख्या गँगस्टरचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले. फलक झळकाविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
बुधवारी सिडको येथे झालेल्या सभेत कुख्यात गुंड बिष्णोई याचे छायाचित्र झळकाविण्यात आल्याविषयी विशेष शाखेकडे अहवाल देण्यात आला आहे. मोनिका राऊत (पोलीस उपायुक्त परिमंडळ-दोन)