नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ११२ शिक्षणक्रमांच्या परीक्षांना २७ मेपासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमुळे विद्यापीठाची एक जूनची पूर्वघोषित परीक्षा रद्द करून ती पुढे ढकलण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ च्या प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांची सत्र तथा वार्षिक परीक्षा आणि जानेवारी २०२५ च्या सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थीची लेखी परीक्षा राज्यातील ५८० केंद्रांवर होईल. त्यासाठी जवळपास चार लाख २५ हजार २०८ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. त्यात १२१ ज्येष्ठ नागरिक आणि राज्यातील विविध तुरुंगातील ३०१६ कैदींचा समावेश आहे. परीक्षा सुरळीत होण्यासाठी विद्यापीठामार्फत भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही कार्यरत करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एक्झामिनेशन या शीर्षकाखाली मे २०२५ परीक्षेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
एक जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वर्ग ‘क’ ची परीक्षा असल्याने मुक्त विद्यापीठाद्वारे यापूर्वी या दिवशी घोषित परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्याच्या परीक्षा प्रवेशपत्रावर परिपत्रकानुसार सुधारित तारखेची नोंद करून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहे. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या परीक्षा सुरु होत असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली.