लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: महानगर पालिका हद्दीत राहणाऱ्या अपंग प्रवाश्यांना मोफत प्रवास करता यावा यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या (सिटीलिंक) वतीने मोफत कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्डची मुदत ३० जूनपर्यंत होती. मात्र आता त्यास ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अपंग प्रवासी बांधवांना आहे त्याच कार्डचा प्रवासासाठी वापर करता येणार आहे.

सिटीलिंकने एक नोव्हेंबर २०२२ पासून अपंग प्रवाश्यांना मोफत प्रवासासाठी कार्डची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत या कार्डचा वापर ते करू शकत होते. ३१ मार्चनंतर प्रवाश्यांनी मोफत कार्डचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. मात्र त्यानंतर या कार्डला दोनदा मुदतवाढ देऊन या कार्डची मुदत ३० जून २०२३ पर्यंत करण्यात आली होती.

हेही वाचा… नाशिक: राष्ट्रवादी पदाधिकारी सावध भूमिकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता पुन्हा एकदा या कार्डला मुदतवाढ देण्यात आल्याने अपंग प्रवाश्यांना आता ३१ मार्च २०२४ पर्यंत त्याच्या नुतनीकरणाची गरज नाही. कारण दिव्यांग मोफत कार्डची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार आता मोफत कार्ड धारक अपंग प्रवासी ३१ मार्च २०२४ पर्यंत सद्यस्थितीत त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कार्डचा वापर प्रवासासाठी करू शकतात. अपंगांसाठीच्या मोफत कार्डची मुदत वाढविण्यात आल्याने त्यांनी कार्ड नूतनीकरणासाठी पास केंद्रावर गर्दी करू नये, तसेच कार्ड संदर्भातील अद्ययावत माहिती वेळोवेळी प्रवाश्यापर्यंत पोहचविण्यात येईल, असे सिटीलिंकने म्हटले आहे.