अविनाश पाटील

उत्तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हंगामात महायुतीमध्ये वाढलेले बंडखोरीचे पीक उपटणे तर दूर, कापण्याचीही तसदी भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते घेत नसल्याने अधिकृत उमेदवारांना धास्ती, तर बंडखोर निर्धास्त असे चित्र दिसत आहे. शनिवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने खान्देश दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही बंडखोरांविरूध्द कारवाईऐवजी जाता जाता केवळ इशारे देण्याचाच सोपस्कार पार पाडल्याने या इशाऱ्यांचा अर्थ बंडखोरांनी आपआपल्या सोयीनुसार घेत थंड बसण्याऐवजी जोमाने प्रचार सुरू केला आहे.

महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरूध्द नाशिक पश्चिम, नांदगाव, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण, चोपडा, पाचोरा, शिरपूर, साक्री, शिंदखेडा या मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली. त्यातही मुक्ताईनगर, नाशिक पश्चिम, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील बंडखोरी विशेष चर्चेत आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघ भाजपला सोडण्यात आल्याने नाराज सेनेचे महापालिकेतील गटनेते विलास शिंदे यांनी बंड केले. त्यांना मतदारसंघातील शिवसेनेच्या बहुतांश नगरसेवकांची साथ असल्याने भाजपच्या उमेदवार आमदार सीमा हिरे अडचणीत आहेत. नांदगावमध्ये शिवसेनेविरोधात भाजपचे रत्नाकर पवार रिंगणात आहेत. तर, मुक्ताईनगरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यापुढे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार आहेत.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर असतांना नाशिक पश्चिम मतदारसंघातील बंडखोर उमेदवाराविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु, महायुती म्हणून आम्ही युतीच्या उमेदवाराच्या बरोबर  आहोत.

-महेश बडवे (शिवसेना महानगरप्रमुख, नाशिक)