जळगाव – तालुक्यातील धानवड येथील शेतकर्‍याने कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात मंगळवारी गळफास घेतला. शिवाजी पाटील (५५) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. धानवड येथे शिवाजी पाटील हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते.

मंगळवारी राहत्या घराच्या मागच्या खोलीत शिवाजी यांनी दोरीने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती कळविली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शिवाजी पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा – मालेगाव : अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने योगिता हिरेंच्या अडचणीत वाढ, पोषण आहार काळा बाजार प्रकरण

हेही वाचा – मालेगाव : पाणीपट्टी दरवाढी विरोधात मालेगावकर आक्रमक, लोटांगण आंदोलन

आत्महत्या करण्यापूर्वी शिवाजी पाटील यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. कर्जबाजारीला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. त्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत शिवाजी पाटील यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, नातवंडे असा परिवार आहे.