मनमाड – शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पहाटे भरधाव मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर युवक गंभीर जखमी झाला.

किशोर सोनवणे (४०) आणि त्यांचा मुलगा ऋतिक (१३) अशी मयतांची नावे आहेत. अपघातात सोनवणे यांचा पुतण्या किशोर (२५) हा गंभीर जखमी झाला. सोनवणे कुटुंबिय येवला तालुक्यातील नगरसूल जवळील वडाचा मळा येथील रहिवासी आहे. ते दुचाकीवरून अंतापूर येथे दर्शनाला गेले होते. तेथून परतताना हा अपघात झाला. मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक बसल्यानंतर बरेच अंतर दुचाकी फरफटत गेली.

बाजार समिती परिसरात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. शेतकरी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने हा परिसर अपघातप्रवण बनल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. मनमाड शहर पोलिसांनी मालवाहू वाहन चालकास ताब्यात घेतले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गतिरोधक करण्याची मागणी

अपघातानंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गतिरोधक करण्याची मागणी जोर धरत आहे. हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. शेतकरी आणि व्यापारी येथे मोठ्या संख्येने येतात. याआधीही असे अपघात झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि बाजार समिती व्यवस्थापनाने तातडीने गतिरोधक, सिग्नल व अन्य सुरक्षा उपाय योजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.