जळगाव – जिल्ह्यात महिनाभराच्या खंडानंतर सर्वदूर पावसाचे दमदार आगमन झाले असले, तरी अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यांमुळे खरीप पिकांचे बरेच नुकसान झाले आहे. त्यात लम्पी रोगाने पाय पसरल्याने जनावरांवर संक्रांत आली आहे. अशा या प्रतिकूल परिस्थितीतही साजरा झालेल्या पोळा सणाला शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

पोळा हा सण शेतकऱ्यांचा खरा मित्र मानल्या जाणाऱ्या बैल जोडीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. वर्षभर शेतात कष्ट करून शेतकऱ्यांसाठी जीवाचे रान करणाऱ्या बैलांना या दिवशी सक्तीची विश्रांती आणि सन्मान दिला जातो. याशिवाय, पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदे मळणी करून बैलांच्या खांद्याला तेलाची मालीश करून त्यांचा थकवा घालवला जातो. त्यांना वाहत्या पाण्यात स्वच्छ धुतले जाते. पोळ्याच्या दिवशी बैलांना नक्षीदार झूल चढवण्यात येते. अंगावर गेरूचे सुंदर ठिपके मारले जातात. शिंगांना रंगीबेरंगी बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण आणि कासरा चढवला जातो. पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालून बैलांचा विशेष श्रुंगार केला जातो. प्रसंगी त्यांना गोड पुरण पोळीचा नैवेद्य खाण्यास दिला जातो.

नेहमीचा हा सर्व उत्साह यंदाच्या पोळ्याला सुद्धा दिसून आला. मात्र, लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मिरवणुका न काढण्याचे आवाहन केल्याने शेतकऱ्यांना सजविलेल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढता आली नाही. खान्देशात पोळ्याच्या दिवशी सायंकाळी बैलांना बाशिंग बांधून वाजत गाजत गावभर मिरवण्याची प्रथा जोपासली जाते. मात्र, यंदा त्यातही खंड पडला. अनेक शेतकऱ्यांनी घरगुती पातळीवर बैलांना सजवून गोडधोड नैवेद्य तेवढे खाऊ घातले. नंतर त्यांना दिवसभर विश्रांती दिली.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत विषाणूजन्य लम्पी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असून, आतापर्यंत ७२ जनावरे दगावल्याचे आढळले आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोळा सण साजरा करण्यासंदर्भात काही महत्वाच्या सूचना केल्या होत्या. ज्यामुळे यंदा पोळा सण साजरा होईल की नाही ? त्याबद्दल शेतकरी वर्गात साशंकता निर्माण झाली होती.

जिल्ह्यात लम्पीने पाय पसरल्याचे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी यापूर्वीच प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जनावरांचे बाजार, शर्यती, वाहतूक बंदी लागू करण्यात आली आहे. सर्व गोवर्गीय जनावरांचे बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतर यंदाचा पोळा घरगुती पद्धतीने साजरा करण्याचे आणि लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पशुपालक शेतकऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपल्या घरीच बैल पूजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते.