धुळे : ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट वादात सापडला आहे. ठिकठिकाणी भाजप तसेच काही हिंदुत्ववादी संघटनांकडून या चित्रपटास विरोध होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, चित्रपट न पाहताच बहुतेकांनी विरोध सुरु केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. धुळ्यातही ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटास विरोध सुरु झाला आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास करण्यात आला असून धुळे जिल्ह्यात या चित्रपटाचे प्रदर्शन रोखावे, अशी मागणी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.
ऐतिहासीक किंवा राजकीय विषय मांडणारे चित्रपट सातत्याने वादात सापडत आहेत. इतिहासातील घटना दाखविताना चित्रपटात खोडसाळपणा करण्यात आला असल्याचे विरोधी मत असते. तर, विविध पुराव्यांच्या आधारेच इतिहासातील घटना दाखविण्यात आल्याचे चित्रपटाशी संबंधित मंडळींचा दावा असतो. एखाद्या राजकीय घटनेविषयी निर्मित चित्रपटांबाबतही असाच वाद होत असतो. मागील दोन-तीन वर्षात एका ऐतिहासिक मराठी चित्रपटातील भूमिकेविषयी वादंग उठल्यानंतर एका प्रसिध्द अभिनेत्याने अशा ऐतिहासीक चित्रपटांमध्ये यापुढे कधीच काम न करण्याचे जाहीर केले होते. अशा वादांमुळे अनेक निर्माते ऐतिहासीक, राजकीय विषयांवरील चित्रपटांची निर्मिती करण्याऐवजी कोणत्याही वादात अडकणार नाहीत, अशा निव्वळ मनोरंजन करणाऱ्या गल्लाभरु चित्रपटांची निर्मिती करण्यास प्राधान्य देतात.
सध्या महाराष्ट्रात ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटावरुन असाच वाद सुरु झाला आहे. यासंदर्भात धुळे जिल्हाधिकरी भाग्यश्री विसपूते यांना निवेदन देण्यात आले आहे. ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास करण्यात आला असून चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महाराजांविषयी खोटे आणि ऐतिहासिक दावे केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे धुळे जिल्ह्यात सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
परिणामी, जिल्ह्यात चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात यावे. सर्व चित्रपटगृह मालकांना सूचना कराव्यात. तसेच संबंधित निर्माते, लेखक, दिग्दर्शक, माध्यमे आणि संबंधितांवर अफवा पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे, अपप्रचार करणे या कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे भाजपचे आमदार अनुप अग्रवाल, पंकज धात्रक, बबनराव चौधरी, कुणाल चौधरी, विकास गोमसाळे, मोहित देसले, रोहित विभांडिक, शुभम बागुल, हर्षल गवळी, कुणाल तारगे, योगेश देशमुख, वैभव कासार, किरण पाटील आदींसह शिवभक्त, शिवप्रेमी हिंदुत्ववादी तरुण, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी यांनी केली आहे.