नाशिक : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांची राज्यात दलालांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होत असल्याची बाब महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत उघड केली होती. असे प्रकार रोखण्यासाठी महामंडळाने आता सीएससी केंद्राशी करार केला आहे.
महामंडळाच्या नावाने संशयितांनी व्हॉट्सॲप गटावर बनावट जाहिरात टाकून मराठा प्रवर्गात नसलेल्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली. बनावट कागदपत्र सादर करून कर्ज प्रकरण मंजूर करीत लाखोंचे अनुदान लाटल्याचे गेल्या महिन्यात उघड झाले होते. या प्रकरणी गौरव मंचरे (राहता, अहिल्यानगर), राहुल चोळके (अहिल्यानगर), विश्वजित गांगुर्डे, मनोज जगताप आणि विश्वास जगताप यांच्याविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यात दलालांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची फसवणूक होत असल्याचे पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले होते.
असे प्रकार राज्यात कुठेही घडू नयेत म्हणून महामंडळाने सीएससी केंद्राशी करार केला आहे. महामंडळाच्या राज्यातील सर्व लाभार्थ्यांना सीएससी केंद्राच्या माध्यमातून सेवा मिळणार आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख, सीएससी केंद्राचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सीएससी केंद्राचे राज्यात ७२ हजारपेक्षा अधिक केंद्र कार्यरत आहेत. लाभार्थी जवळील केंद्रावर जाऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ कमी दरात घेऊ शकतील. यामध्ये महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज भरणे, कागदपत्र अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे व अत्यावश्यक मार्गदर्शन मिळवणे यासारख्या सुविधांचा समावेश आहे.
सीएससी केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी व खासगी सेवा पुरवण्याचे महत्वाचे माध्यम आहे. महामंडळाच्या करारामुळे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. या माध्यमातून लाभार्थ्यांना गावातूनच पात्रता प्रमाणपत्र (एलओआय) कागदपत्र, बँकेचे कर्ज मंजूरी, बँक हप्त्याच्या नोंदी अपलोड करण्यासाठी प्रत्येकी ७० रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक देशमुख यांनी दिली. यामुळे महामंडळाच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या अनधिकृत दलालांना आळा घालणे शक्य होईल. पुढील काळात महामंडळाचे भ्रमणध्वनी ॲप व चॅट बॉट सारख्या सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहेत.
सीएससी बरोबरच्या करारामुळे आमची उद्दीष्ठ्ये अधिक प्रभावीपणे पूर्ण होतील. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गरजू आणि पात्र तरूणांपर्यंत महामंडळाच्या योजना पोहोचणार आहेत. कमी खर्चात, त्यांच्या घराजवळ आवश्यक सेवा मिळाल्यामुळे त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करून मराठा समाजातील तरूणांना उद्योजक करण्याचा महामंडळाचा उद्देश पूर्ण होईल. – नरेंद्र पाटील (अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ)