लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शहरालगतच्या जानोरी शिवारात रासायनिक खत व औषध निर्मिती कारखान्यात मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजता लागलेल्या आगीवर दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळविले. आगीत कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. कारखान्यातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. रासायनिक पदार्थांचा विजेशी संपर्क येऊन ही आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नाशिक-मुंबई महामार्गावरील जानोरी शिवारात सेनसस ॲग्री सोल्युशन कारखान्यात ही घटना घडली. सकाळी १० ते १५ कामगार नेहमीप्रमाणे काम करीत होते. रासायनिक खते व औषधांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यात रासायनिक घटकांचा साठा आहे. यातील एखाद्या घटकाचा विजेशी संपर्क येऊन शॉर्टसर्किट झाल्याचे सांगितले जाते. आग लागल्यानंतर कामगारांनी बाहेर धाव घेतली. काही वेळात आग सर्वत्र पसरली. धुराचे लोळ दुरवरून दिसत होते. या घटनेची माहिती मिळताच मनपाच्या पंचवटी अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे पंचवटी केंद्राचे प्रमुख प्रदीप बोरसे यांनी सांगितले. कारखान्यात मोठ्या प्रमाणात कच्चा आणि तयार माल होता. आगीत त्याचे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. भाऊसाहेब अहिरे नामक व्यक्तीचा हा कारखाना आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.