दीपावलीची लगबग बाजारपेठांमध्ये सुरू होत असतानाच या वर्षी शहरात फटाक्यांचे एकही दुकान रस्त्यालगत राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. यंदा मोकळ्या मैदानातच हे स्टॉल उभारले जाणार असल्याने नाशिकरोड, देवळाली कॅम्प, पंचवटी व गंगापूर रोड परिसरात रस्त्यांवर उभारले जाणारे स्टॉल राहणार नाहीत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या स्टॉलची संख्याही कमी होण्याची शक्यता आहे. न्यायालयाचे निर्देश आणि सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी या संदर्भातील अधिसूचना प्रसिध्द केली आहे. फटाके विक्रेत्यांसह नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दिवाळीला लवकरच सुरूवात होत असून त्यानिमित्ताने उडविल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांनी विविध र्निबध जारी केले आहेत. या बाबतची अधिसूचना पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी जाहीर केली. दरवर्षी शहरात फटाक्यांचे जवळपास ४०० स्टॉल लागतात, असे नाशिक फटाका असोसिएशनचे म्हणणे आहे. यंदा रस्त्यालगतच्या दुकानांना प्रतिबंध घातला गेल्याने ही संख्या कमी होण्याची शक्यता संघटनेचे प्रमुख जयप्रकाश जातेगावकर यांनी व्यक्त केली. पालिकेने वेगवेगळ्या भागातील मैदानांची जागा पाहून स्टॉल उभारणीचा मनोदय ठेवला आहे. नाशिक फटाका असोसिएशन ४० स्टॉल डोंगरे वसतीगृह मैदानावर उभारणार आहे. पालिकेच्यावतीने फटाका स्टॉलचा लिलाव होत आहे. या पाश्र्वभूमीवर, फटाका विक्रेता आणि वापरकर्ते नागरिक यांनी नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.

फटाका उडविण्याच्या जागेपासून चार मीटर अंतरापर्यंत १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. साखळी फटाक्यात आवाजाची तीव्रता ११५, ११० व १०५ डेसिबलइतकीच असणे गरजेचे आहे. फटाक्यांची दुकाने जमिनीलगत असणे बंधनकारक असून व्यापारी संकुल वा उंचावरील जागेत त्याची विक्री करता येणार नाही. तसेच विक्रेत्यांनी किती प्रमाणात फटाक्यांचा साठा करावा याचे निकषही घालून देण्यात आले आहे.

प्रत्येक स्टॉलमध्ये तीन मीटरपेक्षा कमी अंतर नसावे. कोणत्याही सुरक्षित जाहीर केलेल्या सीमेपासून ५० मीटरपेक्षा कमी अंतरावर स्टॉलची जागा नसावी. एकापेक्षा अधिक स्टॉल असल्यास त्यांचे प्रवेशद्वार समोरासमोर नसावे. फटाके हाताळण्यासाठी पुरेशी जागा, दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ न देणे, अपघातास तोंड देण्यासाठी सुरक्षाव्यवस्था बंधनकारक केली गेली आहे. काही विशिष्ट स्वरुपाच्या फटाक्यांच्या विक्रीला बंदी घातली गेली आहे. शांतता प्रभागात कोणत्याही फटाक्यांचा वापर कोणत्याही वेळेत करता येणार नाही. विक्रेत्यांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असून त्यासाठी जागा देताना या नियमावलीचा विचार महापालिकेला करावा लागणार आहे.

काही ठळक र्निबध

*   १२५ डेसिबल आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापरावर बंदी

*   फटाका स्टॉलमध्ये ५० किलो फटाके व ४०० किलो शोभेच्या फटाक्याच्या साठय़ाची मर्यादा

*   फॉस्फरसयुक्त विषारी फटाक्यांना प्रतिबंध (तडतडी, मल्टिमिक्स, चीलपाल, बटरफ्लाईज्)

*’   १० हजार फटाक्यांपेक्षा अधिकचा लांबीच्या माळीस प्रतिबंध

*    एका ठिकाणी १०० हून अधिक स्टॉल नसावेत

*   खराब स्थितीतील फटाके विक्रीला मज्जाव