नाशिक: नाशिक-पुणे महामार्गावर अपघातांचे सत्र कायम असून सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी सिन्नरजवळील मोहदरी घाटात तीन वाहनांच्या विचित्र अपघातात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अन्य चार जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन विद्यार्थिनींसह दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नाशिक येथील के.टी.एच.एम., भोसला व मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे हे सर्वजण असल्याची माहिती आहे. या वाहनातील काही विद्यार्थ्यांनी मद्यपान केल्याचा पोलिसांना संशय आहे.

गुरूवारी नाशिक-सिन्नर महामार्गावर शिंदे (पळसे) येथे राज्य परिवहनच्या दोन बस, तीन मोटारसायकल आणि मोटार यांच्या अपघातात एक बस पेटून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता. याच मार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. महाविद्यालयीन विद्यार्थी एका विवाह सोहळ्यासाठी निळ्या रंगाच्या स्विफ्ट मोटारीतून दुसऱ्या गावी गेले होते. नाशिककडे परतत असताना मोहदरी घाटात भरधाव मोटार अनियंत्रित होऊन थेट दुभाजक तोडून दुसऱ्या मार्गिकेत जाऊन उलटली. त्या मार्गावरील पांढऱ्या रंगाची स्विफ्ट आणि इनोव्हाला ती धडकली. या अपघातात निळ्या स्विफ्टमधील पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी झाले. तसेच अन्य वाहनातील एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा >>> मनमाडमधून २४ तलवारींचा साठा जप्त; दोन जण ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह पोलिसांनी धाव घेतली. रात्री उशिरा सर्वांची ओळख पटली. मृतांमध्ये हर्ष बोडके (भोसला महाविद्यालय), सायली पाटील (मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय), प्रतिक्षा घुले, मयुरी पाटील व शिवम तायडे (तिघेही के.टी. एच. एम. महाविद्यालय) यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी १७ वयोगटातील असून त्यातील काही नाशिकच्या सिडकोतील रहिवासी असल्याचे सांगितले जाते.