scorecardresearch

गोठय़ातील पाच गाईंची हत्या ; इगतपुरी तालुक्यातील घटना

दुग्ध व्यावसायिक संदीप गुळवे यांच्या राहत्या घराशेजारी असलेल्या गोठय़ात सर्व गाई नेहमीप्रमाणे बांधल्या होत्या.

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक- इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे पशुपालकाच्या गोठय़ात बांधलेल्या पाच गाई सोडून नेत कोणीतरी त्यांची हत्या केल्याचे बुधवारी पहाटे उघड झाले. या घटनेमुळे तालुक्यातील पशुपालकांमध्ये घबराट पसरली आहे. हे कृत्य करणाऱ्याच्या त्वरीत शोध घेण्याची मागणी केली जात आहे.

बेलगाव कुऱ्हे येथील दुग्ध व्यावसायिक संदीप गुळवे यांच्या राहत्या घराशेजारी असलेल्या गोठय़ात सर्व गाई नेहमीप्रमाणे बांधल्या होत्या. पहाटे गाईंना चारा टाकण्यासाठी ते उठले असता त्यांना गाईंचे मांस, डोक्याची शिंगे आणि इतर अवशेष पडलेले दिसले. हे दृश्य पाहून गुळवे यांना भोवळ आली. गुळवे यांना पाहून संशयितांनी कोयता, भूल दिलेल्या औषधाची रिकामी सुई, एका गाईचे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले मांस आणि भूल दिलेली जिवंत गाय तशाच अवस्थेत टाकून पळ काढला.

स्वत:ला कसेबसे सांभाळत गुळवे यांनी आरडाओरडा केला असता गावातील लोक जमा झाले. जमिनीवर पडलेला रक्ताचा सडा, छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडलेले गाईंच्या शरीराचे अवशेष हे सर्व पाहून ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला. घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, करोनामुळे आधीच आर्थिक स्थिती बिकट झालेल्या शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटांची मालिका संपत नसल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे. हे कृत्य करण्याचे कारण काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  महिनाभरात तिसऱ्यांदा गाईंची हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, काँग्रेस नेते संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली कैलास कर्पे, शाखाप्रमुख अंबादास धोंगडे, शिवाजी गुळवे आदी नागरिकांनी वाडीवऱ्हे पोलिसांत धाव घेऊन अज्ञात समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Five cows in cowshed killed in igatpuri taluka zws

ताज्या बातम्या