नाशिक – चुंचाळे औद्योगिक परिसरात एमडी या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यास अंबड पोलिसांनी पाच संशयितांसह ताब्यात घेत त्यांच्याकडून तीन लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

मुंबई येथील साकीनाका पोलिसांनी शिंदे गावात धडक देत भुषण पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेला एमडी कारखाना काही महिन्यांपूर्वी उदध्वस्त केला. यानंतर शहर पोलिसांनी सोलापूरसह अन्य ठिकाणी छापे टाकत अमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र चालूच असून अंबड येथील एक्स्लो पॉइंटजवळ मुंब्रा येथून एक संशयित एमडी या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह दोन पंचाना सूचना केल्या. संशयित मुस्ताक शेख उर्फ भुऱ्या हा काही जणांबरोबर बोलतांना दिसला. एक पाकीट घेऊन एकजण त्यास पैसे देतांना दिसताच तपास पथकाने छापा टाकत पाकीट ताब्यात घेतले. तपासणी केली असता २७.५ ग्रॅम वजनाचा एमडी अमली पदार्थ आणि रोख रक्कम असा तीन लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा : पिंपरी : मंदिरात दर्शन घेण्यास मनाई करत रहाटणीत टोळक्याची एकाला मारहाण

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून मुस्ताक शेख उर्फ भुऱ्या हा एमडी अमली पदार्थ विकण्यासाठी नाशिक येथील चुंचाळे परिसरात आला होता. त्याच्याकडून अमली पदार्थाची खरेदी करतांना अन्य चार संशयितही अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु, पोलिसांनी मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यासाठी अन्य संशयितांची नावे जाहीर केली नाहीत.

Story img Loader