पालकांनी समजाविण्याची गरज, समुपदेशकांचा सल्ला
नाशिक : दहावीची परीक्षा देण्यासाठी केंद्रावर गेलो. आणि दोन-तीन विषय झाल्यानंतर जर करोनाचा संसर्ग झाला तर काय करावे, सुरक्षेची जबाबदारी कोणाची, यासह असंख्य प्रश्नांमुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये केंद्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा देण्याविषयी असणारी भीती उघड होत आहे. दहावी, बारावीची लेखी परीक्षा उंबरठय़ावर असताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता, चलबिचल दिसून येत असल्याने पालकांनी मुलांना समजून घेणे, आधार देणे गरजेचे असल्याचे मत समुपदेशकांनी नोंदविले आहे.
शैक्षणिक विश्वात दहावी-बारावीच्या परीक्षा या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जातात. या परीक्षांचे महत्त्व तसेच भीती लक्षात घेता राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मदतवाहिनी तसेच समुपदेशकांची नेमणूक करण्यात येते. मागील वर्षी करोना संसर्गामुळे दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा होऊ शकल्या नाही. यंदाही दहावी-बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष उपस्थितीत की आभासी पद्धतीने होणार, याविषयी साशंकता निर्माण झाली होती. परंतु, शिक्षण विभागाने परीक्षा प्रत्यक्ष उपस्थितीतच होणार असल्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षेला सुरुवात होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसण, त्यांना धीर देणे, यासाठी मंडळाच्या वतीने परीक्षेच्या अनुषंगाने समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समुपदेशकांकडे दिवसाला ५० हून अधिक विद्यार्थी दररोज संपर्क साधत आहेत. याविषयी आरंभ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या तसेच समुपदेशक संगीता पवार यांनी माहिती दिली. परीक्षेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. परीक्षा कशी होणार, त्याचा आकृतीबंध कसा असेल, पर्यायी की दीर्घ प्रश्नोत्तरे, परीक्षा लिहितांना वेळ पुरेल का, यासह असंख्य प्रश्नांची सरबत्ती होत आहे. मुळात दोन वर्षांपासून शाळा बंद राहिल्याने हे विद्यार्थी शिक्षकांच्या फारशा संपर्कात आले नाहीत. त्यामुळे मुलांच्या मनात अभ्यासाविषयी भीती निर्माण झाली आहे. त्यांचा आत्मविश्वास कमी होत आहे. लिहिण्याची सवय मोडल्याने, वाचन करणे थांबले असल्याने विद्यार्थी परीक्षेला घाबरत आहेत. याशिवाय करोनाविषयी त्यांच्या मनात भीती आहे. ही भीती घालविण्यासाठी पालकांनी त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे पवार यांनी नमूद केले.
जिल्ह्यात १८ समपुदेशकांची नियुक्ती
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यात ४०९ प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात १८ समुपदेशक कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणींसाठी चंपा रणदिवे ७०३०६४२०९१, अनिल आहिरे ८२७५८८६९५७, संगीता पवार ९७६६२४०८२७, एजाज अहमद ९२७००४७४४७, माया हाडगे ९८५०२१२५१० यांच्याशी संपर्क साधावा.