नंदुरबार : जिल्ह्यातील काँग्रेस आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) नेत्यांना चोर म्हणणारे भाजपचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी डॉ. विजयकुमार गावित हे देशातील सर्वाधिक भ्रष्टाचारी व्यक्ती असल्याची टीका केली आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कार्यकर्त्यांच्या सभा आणि मेळाव्यांमधून जिल्ह्यातील नेते आता एकमेकांवर आगपाखड करु लागले आहेत. भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस आणि शिंदे गटाच्या नेत्यांना चोर म्हणून संबोधल्यावर काँग्रेसचे नेते चांगलेच संतापले आहेत. माजी मंत्री के. सी. पाडवी यांनी डॉ. गावितांच्या टिकेला उत्तर दिले आहे.
डॉ. विजयकुमार गावित हे २००४-०९ या कालावधीत आदिवासी विकासमंत्री असतांना त्यांनी आदिवासी खात्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप पाडवी यांनी केला. आदिवासी आश्रमशाळेतील अनेक साहित्य आजही सडत पडले असून याबाबत चौकशीसाठी गायकवाड समिती स्थापन झाली. गावितांचे यासंदर्भात उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा पाडवी यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील एका गावात २०० लोकसंख्या असतांना त्या गावात ८०० मंगळसूत्र वाटप करण्याचा प्रताप गावितांनी केला. भ्रष्टाचारामुळेच नंदुरबार जिल्ह्यात गावित कुटुंबाला तीन खिडकी योजना असे उपहासाने म्हटले जाते. गावित हे भ्रष्टाचार केल्याखेरीज जगू शकत नसल्याचे टिकास्त्र पाडवी यांनी सोडले. आगामी जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये सत्ता यावी म्हणून गावित असे भाषण करत फिरत असल्याचे पाडवी म्हणाले. डाॅ. विजयकुमार गावित किती चोर आहेत, हे जगाला माहीत असून त्यांनी मंत्रीपदाच्या कार्यकाळात केलेले गैरव्यवहार बाहेर काढावे लागतील, असे पाडवी यांनी म्हटले आहे. के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनी लोकसभा निवडणुकीत विजयकुमार गावित यांची कंन्या हिना गावित यांचा पराभव केला. तर विधानसभेत डॉ हिना गावित धडगाव मतदारसंघातून अपक्ष उभ्या राहिल्याने के. सी. पाडवींचे गणित बिघडून त्यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे डॉ. गावित आणि पाडवी हे दोघे माजी आदिवासी विकासमंत्री आहेत.
डाॅ. विजयकुमार गावित यांच्याविरोधात आधीच जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते असताना लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत गावित परिवाराचे राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी डाॅ. विजयकुमार गावित हे गावोगावी फिरु लागले आहेत. विरोधकांवर तोंडसुख घेऊ लागले आहेत. विरोधकांकडूनही त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जात आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी यापुढे अधिक झडण्याची शक्यता आहे.