scorecardresearch

नाशिक : अमृता पवार कायमच भाजप संपर्कात – राष्ट्रवादीचा आरोप

नीलिमा पवार यांच्या कन्या अमृता पवार यांनी नुकताच मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

नाशिक : अमृता पवार कायमच भाजप संपर्कात – राष्ट्रवादीचा आरोप

राष्ट्रवादीचे माजी खासदार डॉ. वसंतराव पवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या कन्या अमृता पवार यांनी नुकताच मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या आरोपांना जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिले आहे. अमृता यांचे आरोप तथ्यहीन असून राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या असतानाही कायमच पक्षाच्या विरोधी भूमिका घेतली. त्या कायमच भाजपच्या संपर्कात राहिल्या, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

हेही वाचा >>> मांडूळ तस्करांच्या वादातून मालेगावात गोळीबार ; तीन संशयित ताब्यात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमृता पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर फडणवीस यांनीही आम्ही बऱ्याच वर्षांपासून त्यांनी भाजपमध्ये यावे, यासाठी त्यांच्या मागे होतो, असे सांगितले. त्या अगोदर आल्या असत्या तर चित्र काही वेगळे दिसले असते. त्यांच्या येण्याने नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात भाजपला फायदा होणार असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी अमृता पवार यांनी माजी पालकमंत्र्यांच्या त्रासाला कंटाळून हा पक्ष प्रवेश करीत असल्याचे सांगितले. भाजपमध्ये विकासाचे राजकारण असून देशाला एका वेगळ्या उंचीवर पक्ष घेऊन जात आहे. यामुळेच पक्षप्रवेशाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> शेतकऱ्यांच्या मोर्चास सामोरे जाण्याचे शिंदे-फडणवीस सरकारपुढे आव्हान

राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करतांना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून मुळात त्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आल्या असतांनाही त्यांनी नेहमीच पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भाजपच्या अनेक कार्यक्रमात तसेच भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या थेट सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठतेबाबत शिकवू नये, असे नमूद केले आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाला कुठलाही फरक पडणार, अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा योगिता आहेर, युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केली आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 23:32 IST
ताज्या बातम्या