scorecardresearch

मांडूळ तस्करांच्या वादातून मालेगावात गोळीबार ; तीन संशयित ताब्यात

या प्रकरणी तालुका पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करत तीन संशयितांना अटक केली असून अन्य संशयितांचा शोध सुरु केला आहे.

nashik mandul smuggling
प्रातिनिधिक फोटो ( Image – लोकसत्ता टीम )

मालेगाव – मांडूळ जातीच्या सापाचा विक्री व्यवहार फिसकटल्याने तस्करांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान गोळीबार करण्यात झाले. तालुक्यातील झोडगे गावाजवळ ही घटना घडली. या प्रकरणी तालुका पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करत तीन संशयितांना अटक केली असून अन्य संशयितांचा शोध सुरु केला आहे. धुळे जिल्ह्यातील उमेश जाधव आणि कैलास मराठे या दोन संशयितांनी दोन महिन्यांपूर्वी एका व्यक्तीकडून दोन लाख रुपयांना मांडूळ जातीचा साप खरेदी केला होता. हा मांडूळ २५ लाखाला विक्री होऊ शकतो आणि मालेगावला तसा खरेदीदार असल्याचे दुकलीने त्यांना सांगितले. त्यानुसार एका पिशवीत ठेवलेला मांडूळ घेऊन सोमवारी चौघे जण धुळ्याहून मालेगावला आले. दरेगाव शिवारातील एका व्यक्तिच्या घरी ते थांबले. परंतु, हा व्यवहार होऊ शकला नसल्याने मांडूळ तस्कर धुळे येथे परत जाण्यास निघाले. त्यावेळी वाटेत झोडगे गावाजवळ काही जणांनी त्यांचे वाहन अडवित पिशवीत ठेवलेले मांडूळ आणि भ्रमणध्वनी हिसकावून घेतला. यावेळी दोन्ही गटात झटापट झाली. एका गटाने गावठी बंदुकीतून गोळी झाडली. ही गोळी कोणालाही लागली नाही.

हेही वाचा >>> शेतकऱ्यांच्या मोर्चास सामोरे जाण्याचे शिंदे-फडणवीस सरकारपुढे आव्हान

बंदुकीचा आवाज आल्याने जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यांनी काही संशयितांना पकडून पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरिक्षक स्वप्नील कोळी हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मांडूळ तस्करी करण्याच्या संशयावरुन उमेश जाधव, कैलास मराठे, प्रमोद अहिरे यांसह पाच जणांविरुध्द तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तसेच तस्कर उमेश जाधव याने गोळीबारप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार इरफान बशीर, इमरान खान, प्रमोद अहिरे, सिराज शेख बशीर आदी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील इरफान, सिराज आणि इमरान या तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मांडूळ जातीचे साप पकडून त्याची विक्री करण्याचे प्रकार शहरात वारंवार घडत असतात. यापूर्वीही पोलीस व वनखात्याने अशा प्रकारे मांडूळ तस्करी करणाऱ्यांचा छडा लावलेला आहे. ताज्या प्रकाराने मांडूळ तस्करीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला असून त्यात शहरातील आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 22:43 IST