जळगाव : जिल्ह्यातील दोन माजी मंत्र्यांसोबत तीन माजी आमदार राष्ट्रवादीमधून (शरद पवार) अजित पवार गटात जाणार असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात दोन्ही माजी मंत्र्यांसह दोनच माजी आमदारांनी शनिवारी प्रवेश केला. पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांचेही नाव संभाव्य प्रवेश घेणाऱ्यात होते. मात्र, त्यांनी प्रवेश टाळल्याचे दिसून आले. त्यांच्या या संदिग्ध भूमिकेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असताना, मी अजित पवार गटात जाणार असल्याची निव्वळ अफवा होती, असा दावा त्यांनी ‘लोकसत्ता’ कडे केला.

शरद पवार यांचे एकेकाळचे खंदे समर्थक दिलीप वाघ हे राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने एकदा पाचोरा मतदारसंघाचे आमदार झाले होते. त्यानंतरही त्यांना राष्ट्रवादीने पुन्हा उमेदवारी दिली, पण त्यांचा पराभव झाला. दरम्यान, नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळण्याच्या आशेवर अजित पवार गटात प्रवेश केला. परंतु, पाचोऱ्याची जागा महायुतीचा घटक पक्ष शिवसेनेकडे (एकनाथ शिंदे) असल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही.विधानसभेची निवडणूक लढविण्यावर ठाम असलेल्या दिलीप वाघ यांनी शेवटी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रत्यक्षात त्यांना आपला प्रभाव सिद्ध करता आला नाही.

शरद पवार गटातून अजित पवार गटात गेल्यानंतरही उपेक्षा पदरी पडल्याने राजकारणात टिकून राहण्यासाठी आता भाजपशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही, या विचाराने त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर फेब्रुवारी महिन्यात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलीप वाघ यांना थोडे दिवस थांबण्यास सांगून मुंबईत पक्ष प्रवेश देण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत पाचोऱ्यात महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी केल्यानंतरही दिलीप वाघ यांना भाजपमध्ये प्रवेश मिळण्याची चिन्हे दिसून येताच शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) गोटात अस्वस्थता पसरली. कदाचित त्यामुळेच माजी आमदार वाघ यांचा भाजपमधील प्रवेश नंतर बारगळला. तेव्हापासून भाजपमधून हिरवा झेंडा मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेले दिलीप वाघ शनिवारी शरद पवार गटातील दोन्ही माजी मंत्र्यांबरोबर अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, मुंबईत पार पडलेल्या अजित पवार गटाच्या प्रवेश सोहळ्यात ते फिरकलेही नाही. मी सध्या कोणत्याच पक्षात नाही. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे. त्यामुळे इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी नमूद केले.