धुळे – दस्तावेजात वारसांची बेकायदेशीरपणे नोंद आणि बनावट नकाशाचा वापर करुन मालमत्ता खरेदी खताद्वारे विकण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नगर भूसंपादन कार्यालयातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून चौघांनाही अटक करण्यात आली आहे.

शहरात स्वस्तिक चित्रपटगृहाची मालमत्ता आहे. या मालमत्तेच्या दस्तावेजावर नगर भूमापन कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन संगनमताने खोडसाळपणा करण्यात आला. हिरालाल शाह यांच्या नावास कंस असतांना तो काढून प्रदीप शाह यांना कारणापुरता उतारा देण्यात आला. या उताऱ्यावरून प्रदीप शाह यांची मालमत्तेवर वारसांची बेकायदेशीरपणे नोंद घेण्यात आली. मालमत्तेसंदर्भात बनावट नकाशाचाही वापर करण्यात आला. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास केला असता मालमत्तेचा  बनावट नकाशा तयार करणारे, बनावट मालमत्ता पत्रक बनवून देणारे, असे नगर भूमापन कार्यालयातील चार जणांची नावे उघड झाली. यात डाटा एन्ट्री ऑपरेटर आनंद मोरे, परिरक्षण भूमापक धमेंद्र खंबाईत, प्रमुख लिपीक देवेंद्र टोपे आणि लिपीक धिरज बोरसे यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक विश्वजीत जाधव हे करीत असून कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे अमोल देवढे, सविता गवांदे, रवींद्र माळी, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गणेश खैरनार आणि विलास पाटील यांच्या पथकाने केली.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले कार्यालय

धुळे नगर भूमापन कार्यालयात मूळ दस्तावेजात खाडाखोड करणे, मालमत्ताधारकांना वेठीस धरणे यांसह मोजणी क्षेत्र बेकायदेशीरपणे वाढविणे किंवा कमी करणे, असे अनेक प्रकार घडल्याचे आरोप केले जातात. कुठल्याही दैनंदिन कामासाठी येणाऱ्यांना वेठीस धरले जाते. या कार्यालयात केवळ दलालांच्याच माध्यमातून कामे पूर्ण होऊ शकतात, असा समज आहे. सामान्य मालमत्ताधारकांना येथील यंत्रणा जुमानत नसल्याने अनेकदा येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ आंदोलने झाली आहेत. अनेकांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वस्तिक चित्रपटगृह मालमत्ता प्रकरणात नगर भूमापन कार्यालयातील ज्यांनी बेकायदेशीर कामे केल्याचे तपासात प्रथमदर्शी उघड झाले, त्यांना अटक करण्यात आली आहे. –श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे)