मालेगाव : महिला व बालकांसाठी सुरू झालेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सरकारी रुग्णालयामुळे मालेगावातील औषधोपचार सुविधांना चांगली बळकटी मिळाल्याचे सिद्ध होत आहे. वर्षभराच्या काळात या रुग्णालयातील महिलांच्या प्रसूतीनंतर जन्मलेल्या बालकांचा ५ हजाराचा टप्पा पार झाला आहे. रुग्णालयाच्या वर्षपूर्ती निमित्ताने रविवारी या रुग्णालयात जन्मास आलेल्या पाच बालकांचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व त्यांच्या पत्नी अनिता भुसे यांच्या हस्ते उत्साहात स्वागत केले गेले.

मालेगाव शहराची लोकसंख्या दहा लाखावर गेली आहे. तसेच तालुका व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांची औषधोपचारासाठी मालेगाववरच भिस्त असते. त्यामुळे येथील सामान्य रुग्णालयातील रुग्णसेवेवर मोठा ताण येत असतो. हा ताण कमी करण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी महिला व बालकांसाठी मालेगावात स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याची कल्पना मांडली.

तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयास मंजुरी मिळाली होती. रुग्णालय उभारणीचे काम पूर्ण झाल्यावर गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले.

या रुग्णालयात वर्षभरात जन्मलेल्या बालकांची संख्या ५ हजार आहे. त्यात सामान्य प्रसूती ३ हजार २०० तर ‘सिझेरीन’ शस्त्रक्रियेनंतर जन्मलेल्या बाळांची संख्या १ हजार ८०० आहे. महिला व १२ वर्षाखालील बालकांसाठी रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. उपचाराबरोबरच रुग्णांसाठी जेवणाची मोफत सोय रुग्णालयातर्फे उपलब्ध करून दिली जाते.

शासकीय रुग्णालयांमधील उपचार व रुग्णसेवेबद्दल लोकांना शक्यतोवर चांगला अनुभव येत नाही. त्यामुळे सरकारी रुग्णालयांऐवजी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याकडे लोकांचा कल अधिक असतो. हे रुग्णालय मात्र त्याला अपवाद ठरले आहे. सरकारी तर नाहीच पण खाजगी रुग्णालयांपेक्षाही येथे उत्तम औषधोपचार उपलब्ध होत असतो, तोही मोफत त्यामुळे बालक व महिला रुग्णांच्या औषधोपचारासाठी या रुग्णालयास विशेष पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

वर्षपूर्तीच्या निमित्ताने रविवारी या रुग्णालयात छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यादिवशी रुग्णालयात आणखी पाच बाळांचा जन्म झाला. भुसे दाम्पत्याकडून या सर्व नवजात बालकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नवजात बाळांना कपडे,त्यांच्या मातांना ‌‌ साडी-चोळी तसेच खारीक,खोबरे वगैरे वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर्स व सेवकांचा भुसे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक पवार, माजी उपमहापौर नीलेश आहेर, डॉ.अनुजा शेवाळे, डॉ. देवीप्रसाद शिवदे, बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील देवरे, राजेश अलिझाड, विकी चव्हाण,संगीता चव्हाण, छायाताई शेवाळे आदी उपस्थित होते.

रुग्णालयात उपलब्ध सुविधा..

आपत्कालिन वैद्यकीय सेवा २४/७, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मॉड्यूलर लेबर रुम, क्ष-किरण व सोनोग्राफी तपासण्या, रक्त साठवणूक केंद्र,रुग्ण्वाहिका / मोफत संदर्भ व वाहतूक,मोफत औषधोपचार व पुरवठा, प्रसुतीपूर्व व पश्चात तपासण्या, सिझेरीयन प्रसूती, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, इतर स्त्री रोग, नवजात व लहान मुलांच्या तपासण्या व उपचार, नियमित लसीकरण इ.