ध्वनिप्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई

नाशिक – शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत जवळपास पाच वर्षानंतर पुन्हा एकदा आवाजाच्या भिंतींचा दणदणाट झाला. तर काही मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाला पुढील वर्षी लवकर या, अशी साद घालत निरोप दिला. सुमारे १३ तास चाललेल्या या मिरवणुकीत आकर्षक पुष्प सजावट, नेत्रदीपक रोषणाई, पारंपरिक पेहरावातील ढोल पथके, मर्दानी खेळ ही वैशिष्टय़े ठरली. राजकीय नेत्यांशी संबंधित रोकडोबा, दंडे हनुमान, शिवसेवा युवक अशा पाच गणेश मंडळांनी आवाजाच्या भिंती उभारल्या होत्या. ध्वनिप्रदूषण नियमावलीचे उल्लंघन झाले असल्यास त्यांच्यावर कारवाईची तयारी पोलिसांनी केली आहे.

हेही वाचा >>> नाशिककरांचा पर्यावरणस्नेही विसर्जनास प्रतिसाद; महापालिकेकडून दोन लाख मूर्तींचे संकलन

वाकडी बारव येथे दुपारी पालकमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, आमदार देवयानी फरांदे, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर आदींच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाला. सुरुवातीला महापालिकेच्या शासकीय मानाच्या गणपतीची पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर थेट मिरवणूकीत सहभागी होऊन पालकमंत्री भुसे यांनी स्वत: ढोल वाजवला. पावसाने उघडीप घेतल्याने भाविकांची अलोट गर्दी होती.

काही वर्षांपासून आवाजाच्या भिंती उभारण्यास व गुलालाच्या वापरास प्रतिबंध होता. यंदा पालकमंत्र्यांनी ध्वनि प्रदूषणाच्या नियमांचे पालन करून परवानगी दिल्यामुळे राजकीय नेत्यांशी संबंधित मंडळांमध्ये आवाजाच्या भिंती उभारण्याची स्पर्धा लागली होती. रोकडोबा मित्र मंडळ, दंडे हनुमान मित्र मंडळ व शिवसेवा युवक यांच्यासह पाच मंडळांनी आवाजाच्या भिंती उभारल्या. रंगीत दिव्यांचे प्रकाशझोत आणि आवाजाच्या दणदणाटाने परिसर दुमदुमून गेला. या मंडळांमध्ये नाचणाऱ्यांची मोठी संख्या होती. कर्कश आवाजाने उपस्थितांच्या छातीवर दडपण येत होते. या स्थितीतही काही जण लहानग्यांना घेऊन नाचत होते.

हेही वाचा >>> नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणुकीत दादा-बाबा हरिहर भेट सोहळा उत्साहात

मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांनी आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गुलालवाडी मित्र मंडळाच्या ढोल पथकांमध्ये युवती व महिलांचा लक्षणीय सहभाग होता. बालगोपाळांचे लेझिम पथक दरवर्षीप्रमाणे लक्षवेधी राहिले. शिवसेवा मंडळाने आणलेले केरळमधील लोककला पथकाचे नृत्य मिरवणुकीतील आकर्षण ठरले. सूर्यप्रकाश नवप्रकाश व अन्य मंडळांनी भव्य मूर्तींवर प्रकाशझोत सोडले होते. एक-दोन मंडळांनी गुलालाचा वापर केला तर बहुतांश मंडळांनी फुलांच्या वापरास प्राधान्य दिले. काही मंडळांच्या पथकांनी चित्तथरारक मर्दानी खेळाचे सादरीकरण केले.

मिरवणुकीत एकूण २१ मंडळे सहभागी झाली होती. यात नाशिक महापालिका, रविवार कारंजा मित्रमंडळ (चांदीचा गणपती), गुलालवाडी व्यायामशाळा, भद्रकाली कारंजा मित्रमंडळ (साक्षी गणेश), श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ पेठ रोड, सूर्यप्रकाश नवप्रकाश (नाशिकचा राजा), सरदार चौक, रोकडोबा, शिवसेवा, शिवमुद्रा (मानाचा राजा), युवक मंडळ, दंडे हनुमान, युनायटेड फ्रेंड सर्कल, शनैश्वर युवक समिती चौक मंडई, नेहरू चौक पिंपळपार आदींचा समावेश होता. दोन मंडळांमध्ये अंतर पडू नये म्हणून पोलिसांनी बरीच खबरदारी घेतली. परंतु, प्रमुख चौक व स्वागत कक्षांसमोर मंडळे रेंगाळत होती. वाद्यांना रात्री बारापर्यंत परवानगी होती. वाद बंद झाल्यानंतर मंडळे विसर्जनासाठी शांततेत मार्गस्थ झाली. दरम्यान, शहरातील नाशिकरोड, पंचवटी, गंगापूर रोड, सातपूर, अंबड, इतर भागातही विसर्जन करण्यात आले. ग्रामीण भागातही असाच उत्साह दिसून आला.

ढोल पथकांच्या दोरखंडांनी चेंगराचेंगरीची स्थिती

बहुतांश मंडळांच्या मिरवणुकीत मोठ्या आकाराच्या ढोल-ताशा पथकांचा समावेश होता. या पथकांनी दोरखंडाची बंदिस्ती करून इतर कोणी मध्ये येणार नाही, अशी व्यवस्था केली होती. मध्यवर्ती भागात त्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने संपूर्ण रस्ता व्यापला. परिणामी मेनरोड, धुमाळ पॉइंट ते महात्मा गांधी रस्ता, अशोक स्तंभ ते रविवार कारंजा या भागात नागरिकांना अतिशय कमी जागा शिल्लक राहिल्याने चेंगराचेंगरी होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. नागरिकांना मार्गावरून मार्गक्रमण करणे अवघड झाले. लहानग्यांना घेऊन आलेल्यांचे प्रचंड हाल झाले. पथकांनी दोरखंडाच्या रेट्यांनी नागरिकांना बाजूला लोटले होते. गर्दीत काहींना धाप लागली होती. यातील काही मार्ग चढ-उताराचा आहे. महिला, लहान मुलांसह भाविकांची कोंडी होत असताना पथकांनी आपली दोरखंडाची बंदिस्ती कमी करण्याचे औदार्य दाखविले नाही. मुळात पोलिसांनी वादकांची संख्या मर्यादित ठेवण्याच्या सूचना आधीच केली होती. परंतु, त्याचे पालन अनेक पथकांनी केले नाही. मोठा डामडौल घेऊन पथके सहभागी झाली. दोरखंडांच्या सहाय्याने वादकांना मोकळी जागा उपलब्ध करताना पथकांनी भाविकांना मात्र वेठीस धरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत काही गणेश मंडळांनी आवाजाच्या भिंती उभारल्या होत्या. संबंधितांकडून ध्वनि प्रदूषण संबंधीच्या नियमांचे उल्लंघन झाले की नाही, याची पडताळणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास या मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. – अंकुश शिंदे (पोलीस आयुक्त, नाशिक)